“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 16:37 IST2025-10-04T16:29:26+5:302025-10-04T16:37:07+5:30
Ramdas Kadam Replied Anil Parab: बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत सीबीआय चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना मी पत्र लिहिणार, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.

“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
Ramdas Kadam Replied Anil Parab: अनिल परब हे अर्धवट वकील असावेत. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अज्ञानाचे प्रदर्शन केले आहे. मी जे दसरा मेळाव्यात बोललो, त्यात मी डॉक्टरांचा उल्लेख केला होता. ते उपचार करत होते. ते त्यांचे म्हणणे आहे. अनिल परब पैशांसाठी त्या डॉक्टरांवर दावा टाकणार आहेत का? असा प्रतिप्रश्न करत शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले.
रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी केलेले दावे, आरोप यांना प्रत्युत्तर दिले. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर इतक्या वर्षांनी रामदास कदम यांना कंठ फुटला आहे. महाराष्ट्रातील मुलभूत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा कुटिल डाव आहे. रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर आमची नार्को टेस्टची तयारी आहे. १९९३ साली रामदास कदम यांच्या बायकोने स्वत:ला जाळून घेतले की त्यांना जाळण्यात आले याचीही नार्को टेस्ट करावी. योगेश कदम गृह राज्यमंत्री आहेत. त्यांच्या बापाने काय उद्योग केले याची चौकशी केली पाहिजे. १९९३ साली गृह राज्यमंत्र्यांच्या आईने स्वत:ला जाळून घेतले होते या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. ज्योती रामदास कदम यांनी स्वत:ला का जाळले, या घटनेचे साक्षीदार आजही आहेत. वेळ पडली की ते समोर येतील, असे अनिल परब यांनी म्हटले होते. यावर रामदास कदम यांनी उत्तर दिले.
मानहानीचा दावा टाकणार, कोर्टात जाणार
माझी पत्नी दोन स्टोव्हवर जेवण बनवत होती. साडीला आग लागली आणि एकच भडका उडाला. मी तिला वाचवले. माझे हात भाजले. जसलोकमध्ये सहा महिने पत्नी अॅडमिट होती. मी जसलोकमध्येच होतो. आजही आम्ही जीवाभावने संसार करतोय. तू काय सांगतो. अशा पद्धतीने तू बदनामी केली ना. त्यावर मी दावा टाकणार आहे. मी यावर कोर्टात पहिल्यांदा जाणार आहे. मानहानीचा दावा टाकणार आहे, असा इशारा रामदास कदम यांनी दिला.
दरम्यान, मुळात म्हणजे बाळासाहेबांचा विषय कोर्टात जावा हे पटत नव्हते. पण मला आणि डॉक्टरांना खोटे ठरवत असाल तर मला कोर्टात जावे लागेल. मी सीबीआय चौकशीची मागणी करणार. तुला कावीळ झाली. तुला दिसणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत सीबीआय चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना मी पत्र लिहिणार, असेही रामदास कदम यांनी स्पष्टपणे सांगितले.