“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 15:45 IST2025-07-14T15:44:56+5:302025-07-14T15:45:59+5:30
Minister Pratap Sarnaik News: अफवांवर विश्वास ठेवू नये, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
Minister Pratap Sarnaik News: राज्य शासनाचा अंगीकृत सार्वजनिक उपक्रम असलेली असलेली एसटी सुमारे ८३ हजार कर्मचाऱ्यांची मातृसंस्था आहे. भविष्यात एसटीचे कदापि खाजगीकरण होणार नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. मुंबईतील परळ बसस्थानकामध्ये कामगार नेते भाई जगताप यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांच्या पुढाकाराने कर्मचारी व प्रवाशांसाठी जलशीतकाचे लोकार्पण करताना मंत्री सरनाईक बोलत होते.
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटीचा कर्मचारी अत्यंत मेहनती आहे. तो काम करीत असलेल्या ठिकाणी त्याला मूलभूत सोयी - सुविधा पुरविणे ही एसटी प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे चालक-वाहक विश्रांती गृह, तेथील प्रसाधनगृह स्वच्छ असली पाहिजेत. त्यासाठी आपण लवकरच खाजगी स्वच्छता संस्था नेमत असून, त्यांच्याकडून विश्रांती गृहाच्या स्वच्छतेबरोबर कर्मचाऱ्यांचे गणवेश स्वच्छ धुऊन इस्त्री करून कर्मचाऱ्यांना देण्याबाबत व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.
एवढेच नाही तर कर्मचाऱ्यांचे केश कर्तनाची व्यवस्था स्वच्छता संस्थेच्या वतीने करण्यात येईल. कर्मचाऱ्यांच्या मुलभूत गरजांकडे अशा प्रकारे लक्ष दिल्यास कर्मचाऱ्यांसाठी, कामगिरी करणाऱ्यांसाठी अनुकूल मानसिक परिस्थिती निर्माण करणे शक्य होते. अर्थात, याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये होऊन त्यांची उत्पादकता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.