मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 11:43 IST2025-07-25T11:39:36+5:302025-07-25T11:43:36+5:30

MNS Shiv Sena Shinde Group: एकही नगरसेवक, एकही आमदार नसलेल्या राज ठाकरेंच्या मनसेशी युतीसाठी प्रत्येकाचा एवढा आटापिटा का सुरू असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे म्हटले जात आहे.

shiv sena shinde group insistence on alliance with mns why all this try for raj thackeray support discussion in politics | मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण

मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण

MNS Shiv Sena Shinde Group: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय गणिते बदलताना पाहायला मिळत आहेत. राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्ती आणि मराठी अस्मिता या मुद्द्यावर विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात असतानाच ठाकरे बंधू यांनी एकत्र येऊन मोठा मेळावा घेतला. ठाकरे बंधू आगामी निवडणुकांमध्येही एकत्र येणार का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत असला, तरी राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा आहे. परंतु, दुसरीकडे महायुतीकडूनही मनसेशी युती होण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले जात आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील काही नेते वरचेवर राज ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवतीर्थावर जाताना पाहायला मिळाले. तर दुसरीकडे विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे उद्धव ठाकरेंना ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी मनसे युतीबाबत भाष्य केले. त्यामुळे मनसेशी युती करण्यासाठी शिंदेसेनेचा प्रयत्न असून, राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

राज ठाकरेंची टाळी विकत की मोफत...?

महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पक्षाने आपल्यासोबत मनसे यावे असा प्रयत्न शिंदे शिवसेनेकडून केला जात आहे. येत्या आठ दिवसात त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करू असे उद्योग मंत्री उदय सामंत सांगत होते. राजने आपल्याला टाळी द्यावी असे शिंदेसेनेला वाटते, याचा अर्थ नेमका काय? हे न कळण्या इतपत राजकारणी, कार्यकर्ते खुळे नाहीत. शिंदे सेनेत प्रवेश केला की त्याला 'भेट' मिळते असे बोलले जाते. राज ठाकरे यांच्याकडून मिळणारी टाळी मोफत असेल की कसे...? याचीही चर्चा सुरू झाली आहे. एकही नगरसेवक, एकही आमदार नसलेल्या मनसेकडून टाळीसाठी प्रत्येकाचा एवढा आटापिटा का सुरू असेल...?, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे.  

दरम्यान, महाराष्ट्राच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांना 'पटक पटक कर मारेंगे', अशी भाषा वापरणाऱ्या भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना काँग्रेसच्या महिला खासदार वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव आणि प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा लॉबीमध्ये जाब विचारला. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी या रणरागिणीचे मुंबईत अभिनंदन करून आभार मानले. हे पाहून क्षणभर वाटले महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपला जात आहे. निदान महाराष्ट्राच्या अस्मितेवर आलेल्या संकटात पक्षभेद विसरून सगळे एकत्र आले. पण जर हीच एकी रस्ते, पाणी, शिक्षण आणि रोजगार आणि विकासाच्या मुद्द्यांवरही दिसली, तर तो दिवस महाराष्ट्रासाठी खरेच भाग्याचा असेल, असे म्हणायला हरकत नाही.

 

Web Title: shiv sena shinde group insistence on alliance with mns why all this try for raj thackeray support discussion in politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.