shiv sena saamna editorial criticize republic tv editor arnab goswami bjp over his whatsapp chat | ...आता त्याच गोस्वामी टोळीनं राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढून भाजपचं तोंड काळं केलं : शिवसेना

...आता त्याच गोस्वामी टोळीनं राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढून भाजपचं तोंड काळं केलं : शिवसेना

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी अर्णब गोस्वामी यांचं व्हॉट्सअॅप चॅट झालं होतं उघडसंवादावरून शिवसेनेकडून पुन्हा एकदा भाजप, अर्णब गोस्वामी यांच्यावर टीका

रिपब्लिकन वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि 'बार्क'चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील संवाद उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. यावरूनच शिवसेनेने आता पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे.  मुंबईपोलिसांना माफिया वगैरे म्हणणारे स्वतः मात्र नीतिमत्तेचा बुरखा पांघरून एक प्रकारे देशाशी गद्दारीच करीत होते व या गद्दारांच्या समर्थनासाठी भाजपवाले रस्त्यावर उतरले होते. आता त्याच गोस्वामी टोळीने राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढून भाजपचे तोंड काळे केले आहे, असे म्हणत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे.

राज्यांतील नेतृत्व हिमतीचे व खमके असेल तर भाजपचे केंद्रातील नेते काहीच करू शकत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा खमकेपणा सिद्ध केलाच, पण अर्णबसारख्या भुताटकीचे खरे रूपही लोकांसमोर आणले. आता ‘अर्णब’चा आणि आपला काही संबंध नसल्याचे भाजप पुढारी सांगत आहेत. हा पळपुटेपणा आहे. मराठीत एक म्हण आहे – ‘केले  तुका आणि झाले माका’. गोस्वामीच्या बाबतीत नेमके तेच घडले आहे, असे म्हणत शिवसेनेने भाजपवर जोरदार टीका केली. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर टीकेचा बाण सोडला आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात ?

तरुण मराठी उद्योजक अन्वय नाईक यांचा अर्णब गोस्वामी याने मानसिक छळ केला. नाईक यांनी गोस्वामीचा स्टुडिओ उभारून दिला, त्याचे पैसे अर्णबने बुडविले. त्या मानसिक तणावाखाली नाईक यांनी आत्महत्या केली. हे सर्व प्रकरण त्यावेळच्या भाजप सरकारने दाबले, पण ‘ठाकरे सरकार’ने नाईक कुटुंबाच्या मागणीवरून या आत्महत्या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडली आणि गोस्वामी महाशयांना बेड्या पडल्या. 

गोस्वामीला पाठिंबा देण्यासाठी तेव्हा ‘भाजप’चे लोक रस्त्यांवर उतरले होते. महाराष्ट्रातील भाजपने तर ‘छाती पिटो’ आंदोलन रस्त्यावर उतरून केले. कोणी छाती पिटत होते, कोणी धाय मोकलून रडत होते, कोणी स्वतःचे मुंडण करून घेतले होते. कारण त्यांच्या दृष्टीने महान ठरलेल्या अर्णब गोस्वामीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या होत्या. उद्योजक अन्वय नाईक यांच्या मृत्यूप्रकरणी ही अटक होती. गोस्वामीची अटक म्हणजे महाराष्ट्रात आणीबाणीच लागू झाल्याची प्रतिक्रिया तेव्हा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली होती, पण आता अर्णब गोस्वामी याचे जे ‘व्हॉट्सऍप चॅट’ उघड झाले आहे, त्यानुसार गोस्वामी याने केंद्रीय मंत्री जावडेकर यांचा उल्लेख ‘यूसलेस’ म्हणत निष्क्रिय, बिनकामाचे म्हणून केला आहे.

केंद्रात कोणी काय काम करायचे हे मोदी किंवा शहा (एनएम आणि एएस) ठरवत नाहीत, तर हे गोस्वामी महाशय ठरवत होते. त्याची वृत्तवाहिनी म्हणजे भाजपचे अधिकृत ‘मुख स्पीकर’ होते व गोस्वामी त्या वृत्तवाहिनीवर बसून जे काही उटपटांग उद्योग करीत होता, ते पत्रकारितेच्या कोणत्याच नीतिनियमात बसत नव्हते. भाजपास जे हवे तेच करायचे किंवा त्यांच्याच इशाऱ्यावर एखाद्यावर भुंकत राहायचे हाच धंदा होता. 

बार्क’, ‘हंस’सारख्या संस्था, त्यांचे अधिकारी खिशात घालून बनावट टीआरपी निर्माण करणाऱया गोस्वामी टोळीचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला. त्याबद्दल मुंबई पोलिसांना लाईफटाइम अचिव्हमेंट पुरस्कारच द्यायला हवा. मुंबई पोलिसांनी फक्त टीआरपी घोटाळय़ातील गोस्वामी टोळीचा सहभाग उघड केला नाही तर देशाचे संरक्षण तसेच राष्ट्रीय सुरक्षेबाबत या टोळीने चालवलेले खेळही उघडे केले आहेत.

संरक्षण खात्यातील गुपिते चोरणाऱयांना देशद्रोही ठरवून त्यांचे कोर्टमार्शल केले जाते. गोस्वामी टोळीने संरक्षण खात्यातील गुपिते चोरून चव्हाटय़ावर आणली हा देशद्रोहच आहे व देशद्रोह्यांवर कारवाई करणे म्हणजे आणीबाणी आहे, असे भाजपसारख्या संघवादी लोकांना वाटत असेल तर त्यांच्या राष्ट्रवादाची व्याख्या तपासून पाहावी लागेल. गोस्वामी याला जेलची हवा खाण्यासाठी हे एवढे पुरावे भरपूर आहेत, असे प्रशांत भूषण यांच्यासारख्या वकिलांनी स्पष्ट केले आहे, पण लष्कराची गुपिते उघड केल्याच्या आरोपाखाली केंद्र सरकार या माणसाला तुरुंगात पाठविणार आहे काय? कारण अनेकदा असे दिसले की, भाजपच्या या खास अंगवस्त्रास कायद्याचा बडगा बसू नये म्हणून बरीच धडपड मधल्या काळात झाली. 

तो सर्व प्रकार धक्कादायकच होता. म्हणजे गोस्वामी याच्यावर कारवाई होऊ नये, असेच आदेश आपले कोर्ट वारंवार देत राहिले. त्या कोर्टासही आता गोस्वामीच्या कारनाम्याने भोवळ आली असेल. पुलवामात 40 जवान शहीद झाले. या दुःखात सारा देश असताना गोस्वामीला त्याचा टीआरपी वाढल्याचा आनंद झाला होता. पुन्हा बालाकोटवर हल्ला होत असल्याची माहिती या महाशयाने संरक्षण खात्याकडून आधीच फोडली होती. असे एकापेक्षा एक भयंकर अपराध गोस्वामी टोळीने केले आहेत. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: shiv sena saamna editorial criticize republic tv editor arnab goswami bjp over his whatsapp chat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.