...तर २-३ महिन्यात मंत्रिपद काढून घेतील; मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 12:09 IST2024-12-17T11:23:03+5:302024-12-17T12:09:09+5:30
मंत्रिपद न मिळाल्याने पहिल्या दिवशी काही नाराज होऊ शकतात. आम्ही सगळे मिळून समजूत काढू असं सामंत यांनी म्हटलं.

...तर २-३ महिन्यात मंत्रिपद काढून घेतील; मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली भीती
नागपूर - एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुटुंब म्हणून आम्ही काम करतो. आम्ही मंत्री असल्याने ज्यांची नाराजी असेल ती दूर करण्याचं काम करू. आम्ही अनेकांशी चर्चा केली आहे. तानाजी सावंत, विजय शिवतारे हे ज्येष्ठ आहेत त्यांच्याशी एकनाथ शिंदे बोलून घेतील आणि समजूत काढतील. आमचे इतर आमदारही मंत्रिपदासाठी पात्र होते, १२ मंत्री बनवताना नेत्याचाही कस लागतो. मी जर चांगले काम केले नाही तर ज्या नेत्याने आम्हाला मंत्रिपद दिले ते २-३ महिन्यात काढूनही घेऊ शकतात ही भीती आमच्या मनात आहे. त्यामुळे आम्हालाही शिवसेना आमदार, पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन काम करावे लागतील असं विधान मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या नेत्यांवर सामंत यांनी भाष्य केले.
हिवाळी अधिवेशनात मंत्री उदय सामंतांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मंत्रिपद न मिळाल्याने पहिल्या दिवशी काही नाराज होऊ शकतात. आम्ही सगळे मिळून समजूत काढू. आम्ही १२ मंत्री म्हणजे ६० आमदार मंत्री असल्यासारखेच आहेत. आम्ही कुठेही आमदारांवर अन्याय होऊ देणार नाही. ६० आमदारांना बरोबर घेऊन महाराष्ट्राची सेवा करणे ही आमची जबाबदारी आहे. मंत्री कुणाला करायचे की नाही याला बंधने आहेत. ४३ मंत्री आम्हाला करायचे होते. तिन्हीही नेत्यांनी विचार करून मंत्रिपद वाटप केले असेल त्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. ज्यांना मिळाली नाही तेदेखील तेवढेच सक्षम होते. आमच्या पक्षातील अनेक नेत्यांना मंत्रिपदे मिळायला हवी होती. परंतु ४३ पैकी १२ मंत्रिपदे शिवसेनेला मिळाली आहेत. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी आमदारांमध्ये विश्वास निर्माण करणं गरजेचा आहे ते आम्ही करू असं त्यांनी सांगितले.
तसेच मलाईदार खाते, समन्वयाचा कुठेही अभाव नाही. तिन्ही नेते साम्यंजस्याने खातेवाटप करतील तुम्हाला अपेक्षित ब्रेकिंग न्यूज तुम्हाला मिळणार नाही. छगन भुजबळ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत. मी शिवसेनेत असल्याने त्यांच्यावर मी भाष्य करणे योग्य नाही. त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. त्यांची नाराजी दूर करण्याचं काम अजितदादा करतील. ज्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्राचं नेतृत्व केले आहे त्यांच्यावर मी बोलणे उचित राहणार नाही असं सामंत यांनी म्हटलं.
दरम्यान, या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास नाही, लक्षवेधी नाही परंतु महाराष्ट्राच्या जनतेला अभिप्रेत प्रश्न विरोधकांनी विचारले तर सरकार त्याला उत्तर द्यायला सक्षम आहे. मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले नसले तरी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उत्तर द्यायला सक्षम आहेत. खातेवाटप लवकर होईल. सगळे मंत्री महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतील असं सांगत मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना टोला लगावला.