CoronaVirus: “देवेंद्र फडणवीसच आभासी”; मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून शिवसेनेचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 11:51 IST2021-05-09T11:48:48+5:302021-05-09T11:51:29+5:30
CoronaVirus: कोरोनाच्या संदर्भात आभासी चित्र रंगवले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याला आता शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

CoronaVirus: “देवेंद्र फडणवीसच आभासी”; मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून शिवसेनेचा पलटवार
मुंबई: देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते. मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी कोरोनाचा कहर कायम असल्याचे दिसून येत आहे. मात्र, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा लपवला जात असून, कोरोनाच्या संदर्भात आभासी चित्र रंगवले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याला आता शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले असून, देवेंद्र फडणवीसच आभासी असल्याची टीका करण्यात आली आहे. (arvind sawant replied devendra fadnavis over corona situation)
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सर्व खासदारांची एक बैठक घेण्यात आली. यानंतर खासदार अरविंद सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केले आहे. देवेंद्र फडणवीस हेच आता आभासी झाले आहेत, असा टोला अरविंद सावंत यांनी यावेळी बोलताना लगावला.
तुमच्या देवाचे हात रक्ताने माखले आहेत; अमेरिकेतील मोदी भक्तांना खुले पत्र
देवेंद्र फडणवीस हेच आभासी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये कोरोनाच्या स्थितीसंदर्भात आभासी चित्र रंगवले जात आहे, अशी टीका केली आहे. परंतु, पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून कोरोनाच्या लढ्याबाबत कौतुक केले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही राज्याची आणि मुंबईच्या कामाची दखल घेतली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हेच आभासी ठरले आहे, अशी टीका सावंत यांनी केली आहे.
फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबईतील कोरोना मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे, असे घडत आहे. त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होतेय. हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात एका दिवसात ४ लाख ३ हजार ७३८ नागरिक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. काहीसा दिलासादायक बाब म्हणजे याच कालावधीत देशभरात ३ लाख ८६ हजार ४४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात सलग चौथ्या दिवशी चार हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे.