मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांची भूमिका दुटप्पी, लोक माझे सांगातीचा दाखला देत भाजपाची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 19:30 IST2023-09-03T19:29:41+5:302023-09-03T19:30:26+5:30
BJP Criticize Sharad Pawar: मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर शरद पवार यांनी केलेल्या आरोपांना भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. तसेच शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राचा बारकाईने अभ्यास केला तर त्यांची दुटप्पी भूमिका लक्षात येईल, असा दावा भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांची भूमिका दुटप्पी, लोक माझे सांगातीचा दाखला देत भाजपाची बोचरी टीका
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. त्यातून परवा जालना येथे आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याने वातावरण अधिकच तापलं आहे. या आंदोलनस्थळी आंदोलकांची भेट घेतल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मुंबईवरून फोन आल्यानंतर लाठीमार करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला होता. त्याला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. तसेच शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राचा बारकाईने अभ्यास केला तर त्यांची दुटप्पी भूमिका लक्षात येईल, असा दावा भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.
याबाबत केलेल्या फेसबूक पोस्टमध्ये केशव उपाध्ये यांनी लिहिले की, शरद पवार यांच्या वाजत गाजत आलेल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राचा बारकाईने अभ्यास केला तर त्यांची दुटप्पी भूमिका लक्षात येईल.मराठा तरुणांमध्ये असंतोष वाढत गेल्याचे मुद्दे त्यांनी पुस्तकात मांडले आहेत. या काळात ते सत्तेवरही होते. त्यावेळी मराठा समाजाला शांत करण्यासाठी त्यांनी काय केले? आरक्षणाला थेट कायदेशीर अडचणी होत्या, तर मराठा तरुणांच्या सक्षमीकरणासाठी पवार साहेबांनी काय प्रयत्न केले?असा सवाल उपाध्ये यांनी विचारला.
या पोस्टमध्ये ते पुढे लिहितात की, देवेंद्र फडणवीस यांनी सारथी सुरू केली. ज्यातून १०० पेक्षा जास्त मराठा तरुण झाले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सुरू केलं, ज्यामुळे मराठा तरुण छोटे-मोठे व्यवसाय करू लागले. त्याबरोबरच देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून आरक्षण सुप्रिम कोर्टापर्यंत टिकवले. पण शरद पवार शिल्पकार असलेल्या सरकारच्या दुर्लक्षामुळे ते आरक्षण गेले. यावर पवार साहेबांना कधी कळवळा आला? अशी विचारणाही त्यांनी केली.
शरद पवार हे त्यांच्याच आत्मचरित्रात म्हणतात की, आरक्षण देण्याचा मुद्दा वादग्रस्त ठरू शकतो. जी समाजाची गरज आहे, त्यात काय आलं वादग्रस्त? म्हणजे याचाच अर्थ मराठा आरक्षणाला शरद पवार यांचा पाठिंबा नाही, हीच त्यांची मूळ भूमिका दिसते, असा आरोपही उपाध्ये यांनी केला.