'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 22:58 IST2025-04-30T22:57:37+5:302025-04-30T22:58:22+5:30

Caste Census: गेल्या अनेक वर्षांपासून जातनिहाय जनगणनेसाठी आवाज उठवला जात होता, असेही रक्षा खडसे म्हणाल्या.

Sharad Pawar NCP Raksha Khadse trolls Modi Government over caste census decision | 'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

Caste Census: मोदी सरकारने आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला. आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये केंद्र सरकारने देशात जातिनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. सीसीपीएच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली. मोठ्या कालावधीपासून विविध संघटना आणि विरोधी पक्षांकडून जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाला. या निर्णयाचे विरोधकांनीही स्वागत केले, पण शरद पवार गटाच्या महिला नेत्या रक्षा खडसे यांनी सरकारला टोला लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे स्वागत केले. पण त्यासोबतच त्यांनी केंद्र सरकारला टोलाही लगावला. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले, "केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अनुमतीनंतर अखेर देशात जातनिहाय जनगणना होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जातनिहाय जनगणनेसाठी आवाज उठवला जात होता. शेवटी आज या लढ्याला यश आले आहे. माझं जनतेला सांगणे आहे की अल्पमतातील/आघाडी सरकार किती महत्वाचे आहे हे यातून दिसून येते. बहुमत असलेले 'मोदी' सरकार हा निर्णय घेण्यासाठी टाळाटाळ करत होते. आता मात्र सरकारला टेकू असल्याने मनमानी करता येत नाही. असो, या निर्णयामुळे आपल्या राज्यात प्रलंबित असलेले विविध जाती समूहाच्या आरक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील हीच अपेक्षा."

जयंत पाटील काय म्हणाले?

अजित पवारांच्या राष्ट्रवादीपाठोपाठ शरद पवार गटाकडूनही या निर्णयाबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. "केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातनिहाय जनगणनेला मान्यता देण्यात आली असून लवकरच देशात जातनिहाय जनगणना होणार आहे. मी या निर्णयाचा सहर्ष स्वागत करतो. गेल्या अनेक वर्षांपासून जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी आम्ही मागणी करत होतो. जातनिहाय जनगणनेमुळे आपल्या देशातील समतेचा विचार आणखीन दृढ होईल याबाबत मला विश्वास आहे," असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

 

Web Title: Sharad Pawar NCP Raksha Khadse trolls Modi Government over caste census decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.