Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:18 IST2025-12-18T12:14:52+5:302025-12-18T12:18:38+5:30
Supriya Sule On Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतल्यास खासदार सुप्रिया सुळे यांनी बीडमध्ये उपोषण करण्याचा इशारा दिला.

Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असून नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे कोकाटे यांची आमदारकी रद्द झाली आणि त्यांचे मंत्रिपदही गेले आहे. कोकाटे यांच्याकडून खाते काढून घेतल्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या शक्यतेने शरद पवार गट आक्रमक झाला असून खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला थेट इशारा दिला.
क्रीडा व युवककल्याण, अल्पसंख्याक विकास व वक्फ मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार त्यांची आमदारकी आपोआप रद्द झाली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंची खाती काढून ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवा, असे पत्र बुधवारी रात्री राज्यपालांना दिले. त्यानुसार राज्यपालांनी कार्यवाहीदेखील केली.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
दरम्यान, रिक्त झालेल्या मंत्रिपदाच्या जागेसाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात येण्याच्या चर्चेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी कडाडून टीका केली. "धनंजय मुंडे यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली याचे मला वाईट वाटते. ज्या नेत्यावर टोकाचे आरोप झाले आहेत, त्यांना अमित शाह भेट कशी काय देतात?" असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, "धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नसले तरी, आरोपांमध्ये तथ्य असल्याशिवाय सरकारने त्यांचा राजीनामा घेतला का? आता पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात घेण्याचे प्रयत्न होत असतील, तर आम्ही गप्प बसणार नाही. जर धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री केले, तर आम्ही बीडला जाऊन उपोषण करू आणि राज्यभर मोठे आंदोलन छेडू."
राजकीय पेच वाढणार?
एकीकडे माणिकराव कोकाटे यांच्या निमित्ताने सरकारला कायदेशीर धक्का बसला असताना, दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशावरून शरद पवार गट रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. यामुळे येत्या काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा संघर्ष पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे.