शरद पवार गट लवकरच सत्तेत सहभागी होईल; शिवसेना मंत्र्यांच्या दाव्याने राजकीय खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 18:25 IST2025-01-10T18:24:05+5:302025-01-10T18:25:18+5:30
दिल्लीत संसदेच्या अधिवेशनावेळी अजित पवारांसह सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राष्ट्रवादीचे २ गट पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली.

शरद पवार गट लवकरच सत्तेत सहभागी होईल; शिवसेना मंत्र्यांच्या दाव्याने राजकीय खळबळ
मुंबई - मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना जोर आला आहे. त्यात प्रामुख्याने शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्रित येतील अशी चर्चा आहे. शरद पवारांनी या चर्चेला ठामपणे नकार दिला असला तरी दिल्लीतील गाठीभेटी आणि खासदारांच्या फोडाफोडीच्या बातम्या थांबल्या नाहीत. त्यातच शिवसेना मंत्र्याने केलेल्या दाव्याने राजकीय खळबळ माजली आहे. लवकरच शरद पवार गट सत्तेत सहभागी होईल असा दावा शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संजय शिरसाट म्हणाले की, महाविकास आघाडीत मुद्दाम मिठाचा खडा टाकणारे पहिले संजय राऊत होते. महाविकास आघाडी आता राहणार नाही. त्यांना काँग्रेससोबत जाण्याची गरज वाटत नाही. शरद पवारांची भूमिका दिवसेंदिवस बदलताना आपण पाहतोय. याचा अर्थ असा होतो की आता आपल्याला सत्तेत जायचं आहे. सत्तेशिवाय जे राहू शकत नाही त्यांचे मन परिवर्तन होऊन ते युतीच्या किंवा अजित पवारांसोबत जाण्याचा प्रयत्न राहील. येत्या महिनाभरात हाच प्रयत्न तुम्हाला दिसून येईल असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच राष्ट्रवादीला भूमिका बदलायची सवय आहे. हीच राष्ट्रवादी कधीकाळी काँग्रेसमधून बाहेर पडली. त्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये गेली. ज्यांच्या कधी आयुष्यात जमलं नाही त्या उबाठासोबत त्यांनी युती केली. पहाटेचा शपथविधीही यांनीच केला. भविष्यात यांचा वेध सत्तेच्या दिशेने आहे जे सगळ्यांना जाणवतंय. येत्या महिनाभरात राष्ट्रवादीचा वेगळा अजेंडा तुम्हाला पाहायला मिळेल असंही मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले आहे.
दरम्यान, उबाठा गट काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडत नाही तर ते यांना सोडतायेत म्हणून आता तडफड चालू आहे. त्यांना जाणीव होऊ द्या, ते हात पुढे करत नाहीत मग टाळी द्यायची की नाही आम्ही ठरवू. ३-३ वेळा देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटणे, यांच्या बदलत्या भूमिका महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत त्यामुळे यांच्या भूमिकेवर कुणीही विश्वास ठेवत नाही. आम्ही ४० चे ६० आमदार झालो उद्धव ठाकरेंचे ५६ चे २० आमदार झालेत. भविष्याची बाता करणाऱ्यांनी स्वत:चं भविष्य पाहावे असा टोला मंत्री संजय शिरसाट यांनी लगावला.