पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 14:13 IST2025-11-08T14:10:12+5:302025-11-08T14:13:36+5:30
Sharad Pawar News: कुटुंब आणि राजकारण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, असे सांगत शरद पवार यांनी पार्थ अजित पवार जमीन व्यवहार प्रकरणावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
Sharad Pawar News: पुण्यातील मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणात एक रुपयाचाही व्यवहार झाला नसल्याचे सांगत हा संपूर्ण व्यवहारच रद्द करण्यात आला आहे. तर, कोरेगाव पार्क येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपी या कंपनीचा आणखी एक जमीन गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले याच्यासह खडक पोलिस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आता या प्रकरणी शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना महत्त्वाचे भाष्य केले आहे.
पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, कुटुंब आणि राजकारण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पार्थ पवार पुणे जमीन व्यवहार प्रकरणात चौकशी करुन वास्तव समाजासमोर ठेवले पाहिजे. सुप्रिया सुळे यांनी घेतलेली भूमिका हे त्यांचे व्यक्तिगत मत असू शकते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
पार्थ पवारांवर गुन्हा नाही, असे का? शरद पवार म्हणाले...
कंपनीत एक टक्के भागीदारी असलेल्या दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होतो, पण ९९ टक्के शेअर असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा नाही, असे का? असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. यावर बोलताना, याचे उत्तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच देऊ शकतील, असे शरद पवार म्हणाले. दुसरीकडे, कर्जमाफीबद्दल घोषणा प्रत्यक्ष कृती नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटने मतदान घेतल्यास शंका राहणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्याबाबत महाविकास आघाडीने एकत्र बसून निर्णय घ्यावा, असे शरद पवार यांनी सांगितले.