Sharad Pawar: शरद पवार यांची तब्येत आता कशी आहे? घरातल्या व्यक्तीनं दिली महत्त्वाची अपडेट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 15:35 IST2026-02-14T15:29:39+5:302026-02-14T15:35:41+5:30
Sharad Pawar Health Update: राष्ट्रवादीचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Sharad Pawar: शरद पवार यांची तब्येत आता कशी आहे? घरातल्या व्यक्तीनं दिली महत्त्वाची अपडेट!
राष्ट्रवादीचे (शरद पवार) राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाद्वारे महत्त्वाची माहिती दिली. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत असलेल्या पवार साहेबांना आज डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला असून, त्यांची प्रकृती आता उत्तम असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढील तीन ते चार दिवस पूर्णतः विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "पवार साहेबांच्या तब्येतीत आता पूर्णपणे सुधारणा झाली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढील तीन ते चार दिवस घरीच राहून पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. या विश्रांतीनंतर ते पुन्हा आपल्या दैनंदिन कामाला आणि सार्वजनिक उपक्रमांना सुरुवात करतील."
आदरणीय पवार साहेब यांची तब्येत बरी असून त्यांना डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आहे. त्यांना तीन चार दिवस आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानुसार ते घरीच आराम करणार असून त्यानंतर ते आपल्या दैनंदिन कामास सुरुवात करतील. साहेबांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल…
— Supriya Sule (@supriya_sule) February 14, 2026
पवार साहेब रुग्णालयात असताना देश आणि राज्यभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. या कठीण काळात मिळालेल्या प्रेमाबद्दल सुप्रिया सुळे यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत. पवार साहेबांवर उपचार करणारे रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टर, परिचारिका आणि सर्व सपोर्टिंग स्टाफ यांनी घेतलेल्या काळजीबद्दल सुप्रिया सुळे यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांच्या तत्पर सेवेमुळे साहेबांच्या प्रकृतीत जलद सुधारणा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.