विश्वासघातकी राजकारणाचे जनक कोण? महाराष्ट्राने तुम्हाला हद्दपार केले; भाजपाचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 18:18 IST2025-01-14T18:17:38+5:302025-01-14T18:18:50+5:30
सत्य बोचरं असते, सत्य पचवणं कठीण असते. अमित शाहांनी सत्य मांडलं. १९७८ साली अस्थिर विश्वासघातकी आणि पाठीत खंजीर घुसवणाऱ्या राजकारणाची सुरुवात कुणी केली हा प्रश्न शरद पवारांच्या जिव्हारी लागला असं शेलारांनी म्हटलं.

विश्वासघातकी राजकारणाचे जनक कोण? महाराष्ट्राने तुम्हाला हद्दपार केले; भाजपाचा पलटवार
मुंबई - शरद पवारांचा कुठेतरी तोल जाऊ लागलाय याची चिंता वाटते. अमित शाह बोलले ते सत्य बोलले. भाजपाचं अधिवेशन आणि अमितभाईंचं भाषण शरद पवारांच्या जिव्हारी लागलं. तुम्ही तडीपारीची भाषा करता, हीच भाषा आणि अशाच वक्तव्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या मित्रपक्षाला महाराष्ट्राने हद्दपार केले. तुम्ही तडीपारीची भाषा आम्हाला नका सांगू. महाराष्ट्रातील मराठी माणसाने तुम्हाला हद्दपार केले त्याचे चिंतन करा असा घणाघात भाजपा नेते मंत्री आशिष शेलार यांनी शरद पवारांवर केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत पवारांच्या आरोपांवर पलटवार केला. शेलार म्हणाले की, न्यायालयात ज्यांना निर्दोषत्व मिळालं त्या अमित भाईंबद्दल वारंवार अशाप्रकारे उल्लेख करणे हे न्यायिक प्रक्रियेला धरून तर नाहीच. लवासाबाबत कोर्टाने दिलेले निर्देश, त्यातील शंका आणि वलय ही चार बोटे कोणाकडे येतात हे लक्षात ठेवा. महाराष्ट्राने असाही नेता बघितला नव्हता हे म्हणण्याची आमच्यावर वेळ आणू नका. जनसंघ आणि भाजपाशी जवळीक तुमची होती हे आज तुम्हीच मान्य केले. कधी कधी सत्य समोर येते. जनसंघाच्या जीवावर तुम्ही सरकार बनवले हे तुम्ही मान्य केले. जरा आणखी खरे बोला. ते सरकार बनवण्यापूर्वी विश्वासघाताचं कुठलं बीजारोपण तुम्ही केले होते असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच कुठल्या नेत्याच्याविरोधात तुम्ही काय केले होते. विश्वासघातकी संस्कृतीचे जनक ४५ वर्षापूर्वी कोण होते ते सत्यही समोर आणा. स्वत: महाराष्ट्रातून हद्दपार झाले त्यांनी तडीपारीची भाषा करू नये. शरद पवारांनी तोल गेल्यासारखं वागू नये. लवासापासून बऱ्याच प्रकरणाचे संकेत कोणाकडे जातात हे बोलायची वेळ आणू नका. सत्तेसाठी आणि राजकारणासाठी वाट्टेल ते याचे जनक कोण त्याचेही उत्तर शरद पवारांनी द्यावे. जनसंघ आणि भाजपासोबत तुम्ही सरकार बनवले. सत्तेसाठी तुम्हाला बाकी काही लागत नाही हेदेखील सत्य आहे असंही आशिष शेलार यांनी सांगितले.
दरम्यान, सत्य बोचरं असते, सत्य पचवणं कठीण असते. अमित शाहांनी सत्य मांडलं. १९७८ साली अस्थिर विश्वासघातकी आणि पाठीत खंजीर घुसवणाऱ्या राजकारणाची सुरुवात कुणी केली हा प्रश्न शरद पवारांच्या जिव्हारी लागला. सत्याचाच विजय होतो. विश्वासघातकी राजकारणाचं ट्रेनिंग उद्धव ठाकरे घेतायेत हे २०१९ ला महाराष्ट्राने पाहिले. महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आलीय ते फुटणार असे आधीच सांगीतले होते. स्वार्थासाठी, सत्तेसाठी एकत्र आले ते आता बाजूला होतायेत. महाराष्ट्राच्या भल्यासाठी मविआतील लोक एकत्र आले नव्हते. त्यांचा स्वार्थ आता संपला त्यामुळे ते दूर जातायेत असा टोलाही आशिष शेलार यांनी मविआ नेत्यांना लगावला.