गुरु-शिष्य नात्याला काळिमा! क्रिकेट कोचकडून अल्पवयीन मुलींचा छेडछाड, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 20:05 IST2026-03-28T20:02:56+5:302026-03-28T20:05:16+5:30
क्रीडा क्षेत्रात गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना कल्याणजवळील टिटवाळा परिसरात उघडकीस आली आहे.

गुरु-शिष्य नात्याला काळिमा! क्रिकेट कोचकडून अल्पवयीन मुलींचा छेडछाड, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
क्रीडा क्षेत्रात गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना कल्याणजवळील टिटवाळा परिसरात उघडकीस आली आहे. क्रिकेटचे प्रशिक्षण देणाऱ्या एका ५९ वर्षीय कोचने दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलींचे वय १२ ते १४ वर्षांच्या दरम्यान आहे. आरोपी क्रिकेट कोचने गेल्या वर्षी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये एका मुलीला अयोग्य पद्धतीने स्पर्श करून तिचा विनयभंग केला होता. हे सत्र एवढ्यावरच थांबले नाही, तर अलीकडेच त्याने दुसऱ्या एका मुलीशीही असेच गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला.
जेव्हा पीडित मुलीने घडलेल्या प्रकाराची माहिती धाडसाने आपल्या पालकांना दिली, तेव्हा या घटनेचे गांभीर्य समोर आले. पालकांनी परिसरातील इतर लोकांशी चर्चा केली असता, आरोपीने शेजारी राहणाऱ्या दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबतही अशाच प्रकारचे चुकीचे कृत्य केल्याचे उघड झाले. आपल्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने दोन्ही मुलींच्या पालकांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले.
पालकांच्या तक्रारीवरून टिटवाळा पोलिसांनी संबंधित ५९ वर्षीय क्रिकेट कोचविरुद्ध विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने हालचाली करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुलांच्या प्रशिक्षणासाठी पाठवताना प्रशिक्षकाची पार्श्वभूमी तपासणे किती आवश्यक आहे, असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. टिटवाळा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.