Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 08:16 IST2025-11-19T08:15:21+5:302025-11-19T08:16:55+5:30
अनगर नगरपंचायत निवडणूक कायम बिनविरोध झाली पाहिजे. तिथे माझी सूनबाई नगराध्यक्ष झालीच पाहिजे या अट्टाहासासाठी अनगरच्या राजन पाटलांनी कटकारस्थान करत उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद केला असा आरोप उमेश पाटील यांनी केला.

Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
सोलापूर - जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीवरून सत्ताधारी महायुतीतील २ घटक पक्ष आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच भाजपात गेलेले माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनगर नगरपंचायतीत १७ पैकी १७ जागा भाजपाने बिनविरोध जिंकल्या. याठिकाणी नगराध्यक्षपदासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उज्ज्वला थिटे यांनी अर्ज भरला होता. मात्र हा अर्ज भरण्यापूर्वी थिटे यांच्यावर प्रचंड दबाव आणला गेला, त्यानंतर स्टेनगन पोलिसांच्या मदतीने उज्ज्वला थिटे पहाटेच निवडणूक कार्यालयात पोहचल्या. तिथे नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटे यांनी अर्ज दाखल केला परंतु अर्जातील त्रुटीमुळे त्यांचा अर्ज बाद झाल्यानं नगराध्यक्षपदाची निवडणूकही बिनविरोध झाली. मात्र यावरूनच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने गंभीर आरोप केले आहेत.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील म्हणाले की, या देशात लोकशाही अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनावर किती दबाव आणि दडपण आणले जाते, त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अनगर नगरपंचायतीची ही निवडणूक आहे. या मोहोळ तालुक्यात कशापद्धतीने जंगलराज, गुंडाराज चालते याचे हे उदाहरण आहे. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरायला जाताना ५०-५० पोलीस स्टेनगन, एके ४७ घेऊन पोलीस बंदोबस्त अर्ज भरावा लागतो अशी इथली परिस्थिती होते. हे जंगलराज मागील ७० वर्षापासून तालुक्यावर आहे. अनगर नगरपंचायत निवडणूक कायम बिनविरोध झाली पाहिजे. तिथे माझी सूनबाई नगराध्यक्ष झालीच पाहिजे या अट्टाहासासाठी अनगरच्या राजन पाटलांनी कटकारस्थान करत उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद केला असा आरोप त्यांनी केला.
तसेच थिटे यांच्या उमेदवारी अर्जात सूचक म्हणून त्यांच्या मुलाची सही होती. त्याने ३-४ वेळा फॉर्म तपासून पाहिला. प्रत्येक ठिकाणी सही आहे की नाही ते तपासले. आता हा अर्ज बाद केला. काहीतरी घोळ करून त्याठिकाणी सूचकाची सही गायब करण्यात आली आहे. मूळ दस्तावेज जिल्हाधिकाऱ्यांची हाती आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्याच्या झेरॉक्स कॉपीवर, प्रत्येक पानावर सही, शिक्का आणि पोचपावती मागितली होती. मात्र ती प्रशासनाने दिली नाही. छाननी अर्ज बाद करणार हे आम्हाला माहिती होते, तुम्ही झेरॉक्स कॉपीवर सही शिक्का का दिला नाही? निवडणुकीला सामोरे जायला यांना भीती वाटते. हा कसला बाहुबाली असं म्हणत उमेश पाटील यांनी राजन पाटील यांच्यावर घणाघात केला.
दरम्यान, तुमच्यात हिंमत होती तर निवडणुकीला सामोरे जायला पाहिजे होते. एका विधवा बाईला तुम्ही घाबरला, सुनेविरोधात ही महिला निवडून येईल म्हणून तिचा अर्ज बाद करता, तुमच्या गावातील लोकांनी तुमची लायकी काय हे दाखवले असते. एका महिलेला घाबरून तुम्ही रडीचा डाव खेळला तो तुम्हाला महागात पडणार आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्रात काय पद्धतीचे राजकारण सुरू आहे, त्यासाठी आम्ही घड्याळाच्या चिन्हावर उमेदवार उभा केला होता, तुम्हाला लोकशाहीचा गळा दाबायचाय. कुठल्याही मार्गाने सत्ता मिळवायची आहे. आमचा निवडणूक आयोगावरही आरोप आहे. राज्यातील निवडणूक आयोग यंत्रणा काय करते? सीसीटीव्ही तपासले पाहिजे असं सांगत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले.