'औरंगजेबाची कबर काढायला तुमची मुलं पाठवा, गरिबांची मुलं पाठवू नका', संजय राऊतांची अमित शाहांवर घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 20:34 IST2025-03-21T20:33:46+5:302025-03-21T20:34:41+5:30
औरंगजेब कबरीच्या मुद्द्यावरुन खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आणि राज्य सरकारवर हल्ला चढवला.

'औरंगजेबाची कबर काढायला तुमची मुलं पाठवा, गरिबांची मुलं पाठवू नका', संजय राऊतांची अमित शाहांवर घणाघाती टीका
Sanjay Raut Amit Shah News: 'देशात एकता आणि अखंडता राखण्याचे, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम गृह मंत्रालयाचे आहे. ज्या शक्ती वारंवार औरंगजेबाचे नाव घेऊन देशात अस्थिरता निर्माण करतात. त्यांना रोखलं नाही, तर हा देश एक राहणार नाही', असे टीकास्त्र शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी डागले. राज्यसभेत बोलताना संजय राऊत म्हणाले, 'तुम्हाला औरंगजेबाची कबर काढायची तर फावडे घेऊन जा. तुमची मुलं पाठवा, गरिबाची मुलं पाठवू नका.'
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राज्यसभेत बोलताना राऊतांनी औरंगजेबच्या मुद्द्यावरून सरकारला घेरले. ते म्हणाले. "गृह मंत्रालयावर आपण चर्चा करतोय आणि मी बघितलं की आपल्या बऱ्याच सदस्यांनी औरंगजेबावर चर्चा केली. काय दिवस आले आहेत, या वरिष्ठ सभागृहात औरंगजेबावर लोक चर्चा करत आहेत. आणि मला वाटतं की, याला जबाबदार आपले गृह मंत्रालय आहे."
तर हा देश एक राहणार नाही, राऊतांचा इशारा
"देशाच्या गृह मंत्रालयाने जर वेळीच अशा ज्या शक्ती आहेत, ज्या वारंवार औरंगजेबाचे नाव घेऊन देशात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. त्यात काही लोक असे आहेत, जे महाराष्ट्रात मंत्री आहे. जे केंद्रात उच्चपदी आहेत. त्यांना जर आपण रोखलं नाही, तर हा देश एक राहणार नाही. देशात एकता आणि अखंडता ठेवण्याचे काम गृह मंत्रालयाचे आहे", असा इशारा राऊतांनी दिला.
"मी बघतोय काही दिवसांपासून या राज्याला पोलिसी राज्य करून टाकलं आहे. त्यांचं काम काय आहे, तर विरोधकांना कमकुवत करणे. राजकीय पक्ष फोडणे, हे गृह मंत्रालयाचे काम आहे. प्रत्येक ठिकाणी. आमदार, खासदारांना खरेदी करण्यासाठी पोलिसांची मदत देणे. हे होत असेल, तर गृह मंत्रालयाचे जे मूळ काम आहे कायदा आणि सुव्यव्यस्ता राखण्याचे", असा टोलाही राऊतांनी शाह यांच्या मंत्रालयाला लगावला.
आता महाराष्ट्रही पेटवला आहे -संजय राऊत
"कालपर्यंत मणिपूर जळत होता. पण, आता महाराष्ट्रही पेटवला आहे. 'नई लाशे बिछाने के लिए, आपने गड़े मुर्दे उखाड़े' ते पण औरंगजेबाच्या नावाने. तीनशे वर्षात नागपूरमध्ये कधी दंगल झाली नाही. नागपूरचा इतिहास आहे. नागपूरसारख्या शहरात दंगल होते आणि तेही मुख्यमंत्र्यांच्या शहरात", अशी टीका राऊतांनी केली.
"मला हे सांगायचं आहे की, जर तुम्हाला औरंगजेबाची कबर तोडायची आहे, तर बिनधास्त तोडा. तुम्हाला कोणी रोखलंय? तुमचे सरकार आहे. केंद्रात आणि महाराष्ट्रात तुमचं सरकार आहे. गृह मंत्री तुमचे आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री तुमचे आहेत. फावडे घेऊन तिकडे जा आणि तोडा. पण, तुमच्या मुलांना पाठवा. आमच्या मुलांना पाठवू नका. तुमची मुले परदेशात शिक्षण घेत आहेत. परदेशात काम करताहेत. आणि गरीब मुलांना पाठवू नका", अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.