प्रदीप कुरुलकरला वाचवण्यासाठी देशद्रोहाचा कायदा रद्द, काँग्रेसचा सनसनाटी आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 23:08 IST2023-08-12T23:07:35+5:302023-08-12T23:08:02+5:30
Nana Patole: प्रदीप कुरुलकर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असल्याचे उघड झाले आहे, त्याला वाचवण्यासाठीच केंद्रातील भाजपा सरकार प्रयत्न करत असून त्याचाच भाग म्हणून देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याची घोषणा करण्यात आली, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

प्रदीप कुरुलकरला वाचवण्यासाठी देशद्रोहाचा कायदा रद्द, काँग्रेसचा सनसनाटी आरोप
मुंबई - केंद्र सरकारने ब्रिटीशकालीन देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या निर्णयावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. प्रदीप कुरुलकर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असल्याचे उघड झाले आहे, त्याला वाचवण्यासाठीच केंद्रातील भाजपा सरकार प्रयत्न करत असून त्याचाच भाग म्हणून देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याची घोषणा करण्यात आली, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, देशातील महत्वाची व गोपनीय माहिती दुश्मन देशाला पुरवणारा व्यक्ती हा देशद्रोहीच आहे. प्रदीप कुरुलकर यानेही अत्यंत गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे, पण त्याच्यावर अजून देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही. प्रदीप कुरुलकर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असल्याचे उघड झाले आहे, त्याला वाचवण्यासाठीच केंद्रातील भाजपा सरकार प्रयत्न करत असून त्याचाच भाग म्हणून देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
भाजपा सरकारमध्ये वेगवेगळ्या वेगवेळळा कायदा लावला जातो. संभाजी भिडे जाहीरपणे दुसऱ्याच्या धर्मावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करतो पण त्याच्याविरोधात कारवाई केली जात नाही कारण भाजपाला तेच हवे आहे. जनतेच्या प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपा या लोकांच्या माध्यमातून जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवर प्रश्न विचारला असता नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केलेली असून मित्रपक्षात काय चालले आहे त्यात आम्हाला काही रस नाही, जे पक्ष भाजपाविरोधात लढण्यासाठी काँग्रेसबरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन लढणार आहोत आणि शरद पवार या लढाईत काँग्रेसबरोबर असतील असा आमचा विश्वास आहे, असेही नाना पटोले म्हणाले.