महाराष्ट्राच्या राजकारणातील दुसरे मोठे बंड, शदर पवार यांनी केले होते पहिले बंड
By वसंत भोसले | Updated: November 24, 2019 07:12 IST2019-11-24T04:09:17+5:302019-11-24T07:12:52+5:30
सत्तांतर किंवा बंडखोरी दोनवेळाच महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यत घडली आहे. ही दोन्ही बंडे पवार यांनीच केली आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणातील दुसरे मोठे बंड, शदर पवार यांनी केले होते पहिले बंड
- वसंत भोसले
कोल्हापूर : सत्तांतर किंवा बंडखोरी दोनवेळाच महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यत घडली आहे. ही दोन्ही बंडे पवार यांनीच केली आहेत. फरक एवढाच की, पहिले बंड शरद पवार यांनी १९७८ केले. वसंतदादांचे सरकार पाडून पुलोद सरकार स्थापन केले. तर दुसरे बंड त्यांचे पुतणे अजित पवार यांनी शनिवारी केले आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपने सरकार स्थापन केले. आता पुतण्याचे हे बंड त्यांच्यावरच बुमरॅँगप्रमाणे उलटविण्याचे आव्हान चुलते पवार यांच्यासमोर आहे.
पहिल्या बंडखोरीत शरद पवार यांनी वयाच्या अडतिसाव्या वर्षी जुलै १९७९ मध्ये वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडी सरकारच्या विरोधात बंड केले होते. या मंत्रिमंडळात शरद पवार उद्योग व कामगार खात्याचे मंत्री होते. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत रेड्डी काँग्रेसमधून बाहेर पडून जनता पक्षाच्या सहकार्याने पुरोगामी लोकशाही दल स्थापन करून मुख्यमंत्रीपद हस्तगत केले होते.
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेत फूट पडल्याच्या दोन घटनांनी राजकीय भूकंप झाले होते. १९९१ मध्ये शिवसेना नेते छगन भुजबळ यांनी पक्षप्रमुखांविरुद्ध नेतृत्वाची संधी न मिळाल्याने बंड केले होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी भुजबळ यांच्यावर ‘लखोबा लोखंडे’ म्हणून टीकास्त्र सोडले होते. शिवसैनिकांनी अनेक हल्ले केले. मात्र, भुजबळ डगमगले नाहीत. बंडखोरांच्या भूमिकेत त्यांनी बहुजन समाजाचे राजकारण केले. त्यांच्याबरोबर सोळा आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
शिवसेनेविरुद्ध दुसरी बंडखोरी २००५ मध्ये नारायण राणे यांनी केली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सेनेचे नेतृत्व देण्याच्या वादातून हे बंड झाले. राणे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन सेनेला आव्हान दिले. पोटनिवडणुकीत दणकेबाज विजय मिळविला. यावेळी ठाकरे यांनी राणे यांच्यावर ‘दीडफुट्या’ म्हणून जोरदार हल्ला चढविला होता. मात्र, त्यांचे बंड मोडता आले नाही. शरद पवार यांना काँग्रेस पक्षात अखिल भारतीय पातळीवर नेतृत्वाची संधी मिळत नाही, या मुद्द्यावर सोनिया गांधी यांच्या परकीय नागरिकत्वाचा मुद्दा उकरून काढून बंड केले. पक्षातून हकालपट्टी होताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची १० जून १९९९ रोजी स्थापना केली. पक्ष यशस्वीपणे चालवित पंधरा वर्षे महाराष्ट्रात आघाडीच्या सरकारमध्ये काम केले. त्यांनी स्वत: दहा वर्षे केंद्रात कृषिमंत्री म्हणून काम केले.
बंडाचे पडसाद
जनता पक्ष, फुटीर काँग्रेस गट, शेकाप आणि अपक्षांच्या सहकार्याने शरद पवार यांनी १८ जुलै १९७९ रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यशवंतराव चव्हाण यांच्या पाठिंब्यामुळेच शरद पवार यांनी बंड केल्याने वसंतदादांविरुद्ध यशवंतराव चव्हाण यांचा पुढे पाच वर्षे संघर्ष होत राहिला. त्याचे पडसाद अनेक वर्ष उमटत राहिले.
बंडाची पुनरावृत्ती
महाराष्ट्रात एकेचाळीस वर्षांपूर्वी पहिले राजकीय बंड करणारे शरद पवार यांना पुतणे अजितदादा यांच्या बंडाला सामोरे जावे लागले आहे. विशेष म्हणजे पवार यांच्या बंडाने वसंतदादा पाटील यांचे सरकार पडले होते आणि त्यांचे स्वत:चे सरकार स्थापन झाले होते. अजित पवार यांच्या बंडाने भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले.