से नो टू टोबॅको

By Admin | Updated: May 31, 2014 01:04 IST2014-05-31T01:04:33+5:302014-05-31T01:04:33+5:30

पालकांचे मुलांकडे होत असलेले दुर्लक्ष, संगत, स्टाईल स्टेटमेंट, शिक्षणातील जीवघेणी स्पर्धा यातून आलेला तणाव आणि खिशात खुळखुळणार्‍या पैशांमुळे युवावर्ग तंबाखू आणि सिगारेटच्या नादाला लागत आहे.

Se no to tobaco | से नो टू टोबॅको

से नो टू टोबॅको

वाढतेय तंबाखूचे व्यसन : ३३ टक्के लोकांना तोंडाचा कॅन्सर
नागपूर : पालकांचे मुलांकडे होत असलेले दुर्लक्ष, संगत, स्टाईल स्टेटमेंट, शिक्षणातील जीवघेणी  स्पर्धा यातून आलेला तणाव आणि खिशात खुळखुळणार्‍या पैशांमुळे युवावर्ग तंबाखू आणि  सिगारेटच्या नादाला लागत आहे.  या पदार्थांंंंच्या सेवनामुळे सुमारे ३३ टक्के लोकांना तोडांचा कॅन्सर  होत आहे, यात युवा वर्गाचे प्रमाण मोठे असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
    बदलत्या काळानुसार आपल्या देशातील संस्कृतीदेखील बदलत चालली आहे. भारत देश  आपल्या संस्कृती आणि परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र अलीकडे घडत असलेल्या घटनांनी आपल्या  देशातील तरु णाई पाश्‍चिमात्य संस्कृतीच्या विळख्यात अडकत असल्याचा प्रत्यय येऊ लागला  आहे. आजचा तरुण महत्त्वाकांक्षी आहे. स्पर्धात्मक युगात, आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी  त्यांची धडपड सुरू आहे. काय चांगलं, काय वाईट या गोष्टींची पारख करून निर्णय घेण्याची क्षमता  त्याच्यात आहे. विशेष म्हणजे तंबाखूजन्य पदार्थांंंंचे दुष्परिणाम माहीत आहेत, मात्र तरीदेखील  तरुणवर्गात तंबाखू सेवनाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. क्षणभर मिळणार्‍या आनंदासाठी युवावर्ग  आपलं आयुष्य खडतर बनवत आहे.
   वाढत्या व्यसनाचं प्रमाण, त्यामुळे होणार्‍या शारीरिक व मानसिक दुष्परिणामांबाबत जनजागृती  निर्माण करण्यासाठी १९९५ मध्ये ‘जागतिक आरोग्य संस्थे’ने ‘नो टोबॅको डे’ची निर्मिती केली.  तेव्हापासून दरवर्षी ३१ मे रोजी हा दिवस पाळला जातो. परंतु आपल्या देशात हा दिवस नावापुरता  उरला असून तंबाखू सेवनामुळे होणार्‍या दुष्परिणामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
तंबाखूमधील चार हजार विविध घटकपदार्थ कॅन्सरला कारणीभूत
तंबाखूमध्ये तब्बल चार हजार विविध घटकपदार्थ आढळतात. त्यातील एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स,  नायट्रोझन्स, टार इत्यादी पदार्थामध्ये कर्कजन्य गुणधर्म असतात. त्याच्या सान्निध्यामुळे सामान्यत:  तोंडाचा भाग कॅन्सरग्रस्त होतो. म्हणूनच तंबाखू खाणारी व्यक्ती तोंडात ज्या ठिकाणी गोळी ठेवते  तेथूनच कर्करोगाला सुरु वात होते.
तंबाखूची अखाद्य पदार्थ                म्हणून नोंद व्हावी
डॉ. कांबळे म्हणाले, केरळमध्ये शिक्षित लोकांची संख्या सर्वाधिक आहे. परंतु येथेही तंबाखूजन्य  पदार्थांंंंचे सेवन करणार्‍यांचे प्रमाण मोठे आहे. शिक्षणामुळे तंबाखूसारखे व्यसन कमी होत नाही  यावरून दिसून येते. भारतात खाद्य पदार्थांंंंमध्ये तंबाखूचीही नोंद आहे. शासनाने याला अखाद्य  पदार्थ म्हणून याची नोंद करावी व जास्तीत जास्त कर आकारावा. यामुळे काही प्रमाणात यावर  अंकुश लागेल. या उत्पन्नातून शासनाला मिळणार्‍या एका वर्षाचा करातून नवीन अद्यावत कर्करोग  रुग्णालय स्थापन करावे. कर्करोगाच्या वेदनेवर ती फुंकर ठरेल.
मुलं अनुकरण करतात
 घरात वडील किंवा आजोबांना व्यसन असेल तर त्याचं अनुकरण मुलं करतात. ७0 वर्षाचा माणूस  सिगारेट ओढतो आणि त्याला काही होत नाही, तर आपल्याला काय होणार? असा गैरसमज तरु  णांमध्ये निर्माण होत आहे. तरु णांमध्ये व्यसनाचं प्रमाण कमी व्हावं, यासाठी पालकांनी मुलांसोबत  सविस्तर चर्चा करणं व शाळा-महाविद्यालयांमध्ये याविषयी जनजागृती निर्माण करणारे उपक्र म  राबवणं गरजेचं आहे असे मत सेंट पॉल स्कूलचे संचालक राजाभाऊ टांकसाळे यांनी व्यक्त केले.

Web Title: Se no to tobaco