नागपूरजवळचे सातनवरी गाव झाले देशातील पहिले स्मार्ट, इंटेलिजंट गाव, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 07:26 IST2025-08-25T07:26:13+5:302025-08-25T07:26:38+5:30
Satnavari Village News: आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेतून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवत सातनवरी गाव एक आदर्श मॉडेल ठरले आहे. लवकरच महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातून १० गावे 'स्मार्ट व इंटेलिजंट' करण्यात येणार आहे.

नागपूरजवळचे सातनवरी गाव झाले देशातील पहिले स्मार्ट, इंटेलिजंट गाव, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
नागपूर - आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेतून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवत सातनवरी गाव एक आदर्श मॉडेल ठरले आहे. लवकरच महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातून १० गावे 'स्मार्ट व इंटेलिजंट' करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास ३,५०० गावांचा कायापालट होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली..
केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्या 'व्हॉइस'ने २४ कंपन्यांच्या मदतीने सातनवरी गावात प्रायोगिक तत्त्वावर आधुनिक तंत्रज्ञान आधारित सेवा सुरू केल्या आहेत. या गावाला देशातील पहिले 'स्मार्ट व इंटेलिजंट' गाव म्हणून घोषित करताना मुख्यमंत्री बोलत होते. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार चरणसिंह ठाकूर, सातनवरीच्या सरपंच वैशाली चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यावेळी उपस्थित होते.
असे आहे स्मार्ट सातनवरी गाव...
देशातील भारतनेट प्रकल्पाच्या धर्तीवर महाराष्ट्रात महानेट प्रकल्प राबविण्यात आला. याअंतर्गत भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांद्वारे स्मार्ट व इंटेलिजंट गावांची योजना आणण्यात आली. यासाठी सातनवरी या गावाची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली.
सातनवरी हे गाव नागपूर शहरापासून अमरावती मार्गावर ३२ किलोमीटरवर आहे. येथे आरोग्य, शिक्षणासोबतच स्मार्ट सिंचन, ड्रोनद्वारे कीटकनाशके व खतफवारणी, बँक ऑन व्हील, स्मार्ट टेहळणी अशा एकूण १८ सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
गावात प्राथमिक शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता व स्मार्ट शिक्षणाचा उपयोग होऊन वैश्विक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळेल व सातनवरी गाव लवकरच देशात एक रोल मॉडेल म्हणून नावारूपाला येईल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
गावकऱ्यांना काय फायदे?
शेती : आधुनिक साधनांनी माती तपासल्याने शेती अधिक वैज्ञानिक पद्धतीने होईल. ड्रोनने पिकांवर लक्ष, मोबाइलवर हवामान अंदाज, बाजारभावामुळे योग्य वेळी निर्णय घेता येईल.
शिक्षण : डिजिटल पुस्तके, AI-सक्षम स्मार्ट क्लासरूम, स्मार्ट अंगणवाडीमुळे शहरी मुलांप्रमाणे शिक्षणाच्या संधी मिळतील.
आरोग्य : ई-हेल्थ कार्डद्वारे आरोग्याची डिजिटल नोंद होईल. मोबाइल क्लिनिक, टेलिमेडिसिनमुळे औषधोपचार अधिक परिणामकारक होईल.
शासकीय कामकाज : ग्रामपंचायतीतून ऑनलाइन अर्ज. डिजिटल रेशन कार्ड, डेटा डॅशबोर्डमुळे सरकारी योजना वेळेत आणि पारदर्शकपणे मिळतील.
दैनंदिन जीवन : स्मार्ट सिंचन, माती सेन्सर, पाणी गुणवत्ता तपासणीमुळे शेतकऱ्यांना पाणी व खतांचा योग्य वापर करता येईल, वेळ, पैसा आणि श्रम वाचतील.