डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 16:04 IST2025-10-29T16:04:05+5:302025-10-29T16:04:54+5:30
Satara Phaltan Women Doctor death case: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात तिची हत्या झाल्याचे आरोप कुटुंबीय आणि विरोधकांकडून होत असताना हॉटेल मालकाने सीसीटीव्ही फुटेज समोर आणले आहे.

डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात तिची हत्या झाल्याचे आरोप कुटुंबीय आणि विरोधकांकडून होत असताना हॉटेल मालकाने सीसीटीव्ही फुटेज समोर आणले आहे. यानुसार ही महिला डॉक्टर मध्यरात्री दीडच्या सुमारास हॉटेलमध्ये राहण्यास आली होती, असे समोर आले आहे. तसेच मालकाने आमच्या हॉटेलला विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे.
हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीला बोलावून तिची हत्या करण्यात आली, असा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. यावर हॉटेल मधुदीपचे मालक दिलीप भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली आहे. सीसीटीव्ही फुटेज दाखवत भोसले यांनी ही डॉक्टर रात्री दीड वाजता हॉटेलमध्ये आली होती. तिची चेक-इनची प्रक्रिया पूर्ण करून तिला रुम देण्यात आली. ती एकटीच आली होती, तिला तिची गाडीही हॉटेलच्या आवारात पार्क करता आली नाही, सिक्युरिटीने ती पार्क केली होती. ती खूप चिंतेत दिसत होती. चेकइनवेळी तिने आपल्याला सकाळी ९.३० ला बारामतीला जायचे असल्याचेही सांगितले होते, असा घटनाक्रम सांगितला आहे.
सकाळी साडेनऊच्या सुमारास तरुणीने हॉटेलमध्ये इंटरकॉमवर फोन केला होता, तो पर्यंत ती व्यवस्थित होती. दुपारी १२.३० ला कर्मचाऱ्यांची शिफ्ट चेंज झाली, तरीही ती बाहेर आली नसल्याने दार वाजविले, उघडले नसल्याने आम्ही पोलिसांना कळविले. पोलीस येण्यास उशीर असल्याने आम्ही वकिलांच्या सल्ल्याने रुम उघडली तेव्हा तिने गळफास घेतल्याचे दिसले, असे भोसले यांनी सांगितले.