डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 13:52 IST2025-10-27T13:51:47+5:302025-10-27T13:52:31+5:30
Satara Phaltan Women Doctor death case: धनंजय मुंडे यांनी रविवारी महिला डॉक्टरच्या बीडमधील घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. यावेळी त्यांनी या महिला डॉक्टरच्या हातावरील लिहिलेला मजकूर हा तिच्या अक्षरातला नसल्याचे आपल्याला तिच्या बहिणीने सांगितल्याचे मुंडे म्हणाले.

डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येवर आता मोठी माहिती समोर येत आहे. या महिला डॉक्टरने पीएसआय गोपाळ बदने याने चारवेळा बलात्कार केल्याचे आणि घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर याने त्रास दिल्याचे हातावर लिहून ठेवले होते. हा मजकूर आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी म्हणून गृहीत धरला जात असताना ते हस्ताक्षर या महिला डॉक्टरचे नसल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे.
धनंजय मुंडे यांनी रविवारी महिला डॉक्टरच्या बीडमधील घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. यावेळी त्यांनी या महिला डॉक्टरच्या हातावरील लिहिलेला मजकूर हा तिच्या अक्षरातला नसल्याचे आपल्याला तिच्या बहिणीने सांगितल्याचे मुंडे म्हणाले.
यामुळे ही आत्महत्या आहे की हत्या याचा तपास व्हायला हवा. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करत त्यांचे सीडीआर तपासण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. डॉक्टर महिलेला तिच्या विशिष्ट जातीमुळे हिणवण्यात येत होते. खासदारांच्या दोन पीएंचा देखील या प्रकरणात संबंध जोडला गेला आहे, असे मुंडे म्हणाले.
काय लिहिले होते...
फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी पीएसआय गोपाल बदने याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आत्महत्येपूर्वी महिला डॉक्टरने आपल्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये बदनेने आपल्यावर चारवेळा बलात्कार केला होता असे लिहिले होते. सोबतच प्रशांत बनकर याने देखील शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याचे म्हटले होते.