Satara Crime: "...तोपर्यंत पोलिसी अत्याचाराला आळा बसणार नाही"; विजय वडेट्टीवार यांचे ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 13:40 IST2025-10-24T13:38:43+5:302025-10-24T13:40:26+5:30
Satara Crime Lady Doctor Case: पोलिस निरीक्षकाने चार महिने बलात्कार केल्याचा आरोप करत महिला डॉक्टरने संपवलं जीवन

Satara Crime: "...तोपर्यंत पोलिसी अत्याचाराला आळा बसणार नाही"; विजय वडेट्टीवार यांचे ट्विट
Satara Crime Lady Doctor Case: साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात काम करत असलेल्या एका वरिष्ठ महिला डॉक्टरनेपोलिसांच्या त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा हे प्रकरण उघडकीस आले. मिळालेल्या माहितीनुसार, उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागाच्या एका वादात अडकली होती. तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर तिच्यावर अंतर्गत चौकशी सुरू झाली. या चौकशीमुळे ती महिला डॉक्टर मोठ्या मानसिक तणावाखाली होती. तसेच, पोलिस निरीक्षक गोपाल बदने याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तिने हातावर लिहिले आणि त्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचलले. घडलेल्या घटनेनंतर राजकीय नेतेमंडळींकडून महायुती सरकारवर टीका केली जात आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनीही यावर चिंता व्यक्त केली असून रोखठोक भूमिका मांडली आहे.
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर सोशल मीडिया एक्सवरून प्रतिक्रिया दिली. "जेव्हा रक्षकच बनतो भक्षक! फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने फाशी घेत आत्महत्या केली. आत्महत्या करताना त्यांनी हातावर सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात उल्लेख आहे, पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने त्यांच्यावर चार वेळा बलात्कार केला, तर पोलीस प्रशांत बनकर याने त्यांना सतत मानसिक त्रास दिला."
जेव्हा रक्षकच बनतो भक्षक!
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 24, 2025
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने फाशी घेत आत्महत्या केली. आत्महत्या करताना त्यांनी हातावर सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात उल्लेख आहे, पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने त्यांच्यावर चार वेळा बलात्कार केला, तर पोलीस प्रशांत बनकर याने त्यांना सतत… pic.twitter.com/LZVj9HOIEN
"पोलिसांचे काम हे रक्षण करण्याचे आहे पण तेच जर महिला डॉक्टरचे शोषण करत असतील तर न्याय मिळणार कसा? या मुलीने याआधी तक्रार करूनही कारवाई का झाली नाही? महायुती सरकार वारंवार पोलिसांना पाठीशी घालत आहे, त्यातूनच पोलिस अत्याचार वाढत आहे. या प्रकरणी नुसते चौकशीचे आदेश देऊन उपयोग नाही. या पोलिसांना नोकरीतून बडतर्फ केले पाहिजे. नाही तर तपासावर ते दबाव टाकू शकतात. आधी तक्रार करूनही त्याची दखल का घेण्यात आली. आधी, कोणी दुर्लक्ष केले, या पोलिसांना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत पोलिसी अत्याचाराला आळा बसणार नाही," असे वडेट्टीवार यांनी ठणकावून सांगितले.
दरम्यान, मृत्यूपूर्वी महिला डॉक्टरने हातावर आत्महत्येचे कारण स्पष्टपणे लिहील्याचे म्हटले जात आहे. पीएसआय गोपाल बदनेने चारवेळा बलात्कार केल्याचे या महिलेने हातावर लिहिले आहे. "माझ्या मरण्याचे कारण PSI गोपाल आहे. त्याने माझा चार वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर यांनी मला ४ महिने शारीरिक आणि मानसिक त्रास दिला," असे या महिला डॉक्टरच्या हातावर लिहिल्याचे आढळून आले आहे.