महिला डॉक्टरचा मृत्यू: राज्यभरात आंदोलन; आज ओपीडीवर बहिष्कार, रुग्णसेवेचा बोऱ्या वाजणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 11:57 IST2025-11-03T11:56:20+5:302025-11-03T11:57:50+5:30
Phaltan Doctor Death: अतितत्काळ विभागातील सेवा मात्र नियमितपणे सुरू राहणार आहे.

महिला डॉक्टरचा मृत्यू: राज्यभरात आंदोलन; आज ओपीडीवर बहिष्कार, रुग्णसेवेचा बोऱ्या वाजणार?
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी लवकरात लवकरच चौकशी होऊन न्याय मिळावा या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व प्रमुख डॉक्टर संघटनांनी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यानुसार सोमवारी राज्यभर ओपीडी सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. या आंदोलनात राज्यातील निवासी डॉक्टरांनी सहभाग घेतला असून, त्यामुळे सरकारी रुग्णालयातील ओपीडी सेवा बंद राहणार असून राज्यभरातील रुग्णसेवा ठप्प होण्याची भीती आहे. दरम्यान, अतितत्काळ विभागातील सेवा मात्र नियमितपणे सुरू राहणार आहे.
या आंदोलनाचा मुंबईतील महापालिकेच्या केइएम, सायन, कूपर, नायर, जेजे आणि जीटी रुग्णालयातील ओपीडी सेवेवर परिणाम दिसून येणार आहे. या आंदोलनात निवासी डॉक्टर संघटना, वरिष्ठ निवासी डॉक्टर संघटना, इंटर्न्स संघटना, शासकीय वैद्यकीय अधिकारी संघटना, इंडियन मेडिकल असोसिएशन या संघटनाचा सहभाग असणार आहे.
प्राध्यापक सेवा देणार
डॉक्टरांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे पालिका व शासकीय रुग्णालयातील ओपीडी सेवा सुरळीत राहावी, याकरिता प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक सेवा देणार आहे.
कॅण्डल मार्च
मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टरांच्या सर्व संघटनांनी एकत्र रविवारी कॅण्डल मार्च करून या घटनेचा निषेध केला.
आंदोलनात निवासी डॉक्टर
आयएमए आणि शासकीय वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने दि. ७ नोव्हेंबरपासून ओपीडी सेवेवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास दि. १४ नोव्हेंबरपासून सर्व आपत्कालीन सेवा बंद करण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. या आंदोलनामध्ये सर्व निवासी डॉक्टर सहभागी होतील.