Satara Accident: भारतीय सैन्य दलात (Indian Army) कार्यरत असलेला जवान पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर गावी आला असताना त्याचा अपघातीमृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना साताऱ्यात घडली आहे. सिकंदराबाद-श्रीनगर येथे भारतीय सैन्य दलात सेवा बजावणारे सातारा तालुक्यातील दरे गावचे वीर जवान प्रमोद परशुराम जाधव यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. या घटनेने दरे गावासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
सुट्टीवर घरी आले होते...
प्रमोद जाधव पत्नीच्या प्रसूतीसाठी ते सुमारे आठ दिवसांपूर्वी सुट्टी घेऊन गावी आले होते. घरात आनंदाचे वातावरण होते. पत्नी गरोदर होती आणि लवकरच कुटुंबात नवा पाहुणा येणार होता. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. एका भीषण रस्ता अपघातात प्रमोद जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्या घरात लवकरच जल्लोष होणार होता, त्याच घरावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला.
आयशर टेम्पोची धडक; जागीच मृत्यू
काही कामानिमित्त दुचाकीवरुन वाढे फाट्याच्या दिशेने जात असताना, आयशर टेम्पोने जाधव यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची बातमी समजताच कुटुंबीयांसह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला.
मृत्यूनंतर काही तासांतच लेकीचा जन्म
आज सकाळी प्रमोद जाधव यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी दरे येथे आणण्यात आले. पार्थिव गावात दाखल होताच एकच आक्रोश झाला. “अमर रहे, अमर रहे, प्रमोद परशुराम जाधव अमर रहे” या घोषणांनी परिसर दुमदुमला. विशेष म्हणजे, याच वेळेत त्यांच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू आणि नव्या पाहुण्याचे आगमन, या परस्परविरोधी दृष्याने संपूर्ण गावाला अश्रू अनावर झाले.
लेकीचे घेतले वडिलांना अखेरचे दर्शन
या घटनेतील सर्वांत वेदनादायक बाब म्हणजे, अंत्यविधीच्या ठिकाणी नुकतीच प्रसूती झालेली पत्नी आणि अवघ्या 8 तासांपूर्वी जन्मलेली चिमुकली मुलगी पित्याच्या अंतिम दर्शनासाठी आली. नुकतीच प्रसूती झाल्याने शरीर अशक्त होते, पण पतीला अखेरचा निरोप देण्यासाठी पत्नी तिथे पोहोचली. अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते, त्यांचा आक्रोश तर काळीज पिळवटून टाकणारा होता. यावेळी नवजात बालिकेने तिरंग्यात लपेटलेल्या वडिलांचे घेतलेले अखेरचे दर्शन पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
शासकीय इतमामात मानवंदना
पार्थिव गावात दाखल होताच एकच आक्रोश झाला. “अमर रहे, अमर रहे, प्रमोद परशुराम जाधव अमर रहे” या घोषणांनी परिसर दुमदुमला. दरम्यान, प्रमोध जाधव यांच्यावर शासकीय इतमामात आणि लष्करी सन्मानासह अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रशासनातील अधिकारी, माजी सैनिक, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या या वीर जवानाच्या अकाली जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Web Summary : Soldier tragically died in Satara while on leave for his wife's delivery. He saw his newborn daughter before his funeral. The village mourns the loss.
Web Summary : पत्नी की डिलीवरी के लिए छुट्टी पर आए सैनिक की सतारा में दुखद मौत हो गई। अंतिम संस्कार से पहले उसने अपनी नवजात बेटी को देखा। गांव में शोक की लहर।