सरपंच हत्या : आरोपींची संपत्ती जप्त करा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश; बंदुकीचे ते परवानेही रद्द करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 06:43 IST2024-12-29T06:42:23+5:302024-12-29T06:43:30+5:30
"‘सीआयडी’ने या हत्या प्रकरणाची चौकशी आधीच सुरू केली आहे. ‘सीआयडी’चे अतिरिक्त महासंचालक प्रशांत बोरुडे यांना फोन करून फडणवीस यांनी सांगितले की, बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा."

सरपंच हत्या : आरोपींची संपत्ती जप्त करा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश; बंदुकीचे ते परवानेही रद्द करणार
मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले.
‘सीआयडी’ने या हत्या प्रकरणाची चौकशी आधीच सुरू केली आहे. ‘सीआयडी’चे अतिरिक्त महासंचालक प्रशांत बोरुडे यांना फोन करून फडणवीस यांनी सांगितले की, बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा. फरार आरोपींनी लवकरात लवकर शरण यावे, यासाठी तपास यंत्रणा दबाव वाढवित असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या आदेशातून स्पष्ट झाले.
बीड जिल्ह्यातील काही नेत्यांचे बंदुकीतून गोळी झाडत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीडच्या पोलिस अधीक्षकांना असा आदेश शनिवारी दिला की बंदुकीसह ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा. बंदुकीचे जे परवाने दिलेले आहेत, त्यांचा तातडीने फेरआढावा घ्या. गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.