संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर काही अजूनही फरार आहेत. दरम्यान, हत्येचा हा खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवण्यासह तीन मागण्या राज्य सरकारकडे केल्या आहेत. सरकारी वकिलांनी खटला लढण्यास नकार दिल्याच्या मुद्द्यावरही दानवेंनी शंका उपस्थित केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल भूमिका मांडली. त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी काही मुद्दे उपस्थित करत राज्य सरकारकडे तीन मागण्या केल्या आहेत.
अंबादास दानवे म्हणाले, "ज्या आरोपींचे मोबाईल जप्त झाले, त्यात व्हिडीओ काय आहेत? त्यांना कोणा-कोणाचे फोन आले? कारण तीन तासांचा काळ मधला आहे. या तीन तासाच्या काळात काय काय झाले, हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. हे लवकरात लवकर बाहेर येण्याचीही गरज आहे."
खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवा -अंबादास दानवे
"सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या एसआयटीच्या टीम आहेत, त्यामध्ये महाराष्ट्रातील तरबेज अधिकारी नियुक्त केले पाहिजेत. हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेर चालला पाहिजे. देशपांडे, जे तिथले सरकारी वकील आहेत, त्यांनी खटला चालवण्यास का नकार दिला, याची सुद्धा माहिती घेतली पाहिजे, अशी मागणी मी राज्य सरकारकडे करतोय", असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.
सरकारी वकिलांनी ऐनवेळी दिला होता नकार
३१ डिसेंबर २०२४ रोजी वाल्मीक कराड याला केज न्यायालयात हजर करण्यात आले होते. कोर्टात सरकारी वकील एस.एस. देशपांडे हे सीआयडीच्या वतीने युक्तिवाद करणार होते. पण, त्यांनी ऐनवेळी खटला लढवण्यास नकार दिला होता. देशपांडे यांनी वैयक्तिक कारण देत दुसऱ्या वकिलांची नियुक्ती करण्याबद्दल कोर्टाला पत्र दिले होते.