Santosh Deshmukh: "नक्की कोण कुणाचा आका?"; फोटो दाखवत संजय राऊतांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 21:10 IST2024-12-30T21:07:11+5:302024-12-30T21:10:40+5:30
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय गदारोळ सुरू असतानाच संजय राऊत यांनी या प्रकरणात नाव घेतले जात असलेल्या वाल्मीक कराड याचा महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांसोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

Santosh Deshmukh: "नक्की कोण कुणाचा आका?"; फोटो दाखवत संजय राऊतांचा सवाल
Santosh Deshmukh Sanjay Raut: संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराड याचे नाव घेतले जात आहे. वाल्मीक कराड फरार असून, त्याच्यासह इतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. विरोधक वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांचे नाव घेत महायुती सरकारला लक्ष्य करत आहे. आता शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी एक फोटो पोस्ट करत कोण कुणाचा आका? असा सवाल केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत सध्या फरार असलेला वाल्मीक कराड आहे. वाल्मीक कराड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहे.
"हाय का नाही, मोठा जोक?"
या फोटोवर 'संतोष देशमुखचा अपराधी कोण आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे यांच्यासोबत फोटो असणारा खंडणीखोर, खुनी, गावगुंड (वाल्मिकी कराड) पोलिसांना सापडत नाही. एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी किती पारदर्शक होईल? हाय का नाही मोठा जोक?", असा मजकूर लिहिलेला आहे.
हाच फोटो पोस्ट करत संजय राऊत यांनी म्हटले आहे की, "व्वा! क्या सीन है?? नक्की कोण कुणाचा आका?"
व्वा! क्या सीन है??
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 30, 2024
नक्की कोण कुणाचा आका?
@Dev_Fadnavis
@anjali_damania
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde pic.twitter.com/a4jw2kWT6V
आका हा शब्द सर्वप्रथम भाजपचे खासदार सुरेश धस यांच्याकडून वापरला गेला. वाल्मीक कराडवर सुरेश धस यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. तर संभाजीराजे छत्रपती यांनी वाल्मीक कराडचा आका धनंजय मुंडे असल्याचा आरोप केलेला आहे.
वाल्मीक कराडविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. २ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप असून, वाल्मीक कराड फरार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचा हात असल्याचा आरोप कुटुंबीय आणि विरोधक यांच्याकडून होत आहे.