"फडणवीसांच्या नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट, कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’’, काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 16:22 IST2024-12-31T16:06:01+5:302024-12-31T16:22:55+5:30
Santosh Deshmukh Murder Case: बीड प्रकरणाने सक्षम नेतृत्व म्हणून गवगवा केला जात असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्यादाही राजकारणापुढे स्पष्ट झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांना पदावर राहण्याचा काय अधिकार आहे?

"फडणवीसांच्या नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट, कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’’, काँग्रेसची मागणी
मुंबई - महाराष्ट्र पोलिसांचा मोठा दबदबा व नावलौकिक आहे, मुंबई पोलिसांची तुलना तर स्कॉटलंड यार्डशी केली जायची. अशा सक्षम पोलीस दलाची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी २० दिवस पोलीस व सीआयडीला सापडला नाही. तो शरण आला हे पोलीस दलाचे अपयशच आहे. बीडमधील संघटीत गुन्हेगारीचा गंभीर प्रकार पाहता या प्रकरणाचा तपास विद्यमान न्यायमूर्ती यांच्या देखरेखीखाली झाला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, राज्यातील पोलीस दल व सीआयडी आजही सक्षम आहेत पण ते राजकीय दबावाखाली असल्याने त्यांचे मनोबल कमजोर होते. आरोपी शरण येतो पण त्याला पकडू शकत नाही ही लाजीरवाणी व दुर्दैवी बाब आहे. बीड प्रकरणाने सक्षम नेतृत्व म्हणून गवगवा केला जात असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्यादाही राजकारणापुढे स्पष्ट झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांना पदावर राहण्याचा काय अधिकार आहे? नागपूरमध्ये ७ दिवसात ७ खून झाले आहेत, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा व मीडियातून स्वतःचे कौतक थांबवावे असेही अतुल लोंढे म्हणाले.
बीड प्रकरणात सत्ताधारी पक्षाचे आमदारच सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करत आहेत. बीड मधील गुन्हेगारीला सत्ताधारी पक्षाचे आमदार ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ म्हणतात. बीडमधील गुन्हेगारीला आळा घालून राजकीय आशिर्वादाने फोफावलेली ही विषवल्ली कायमची नष्ट करा व यामागे ज्यांचा हात आहे त्यांनाही अद्दल घडवावी असे अतुल लोंढे म्हणाले.