बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूरपणे झालेल्या हत्येमुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. या हत्याकांडावरून जनप्रक्षोभ उसळल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला गती येऊन आरोपींना अटक झाली होती. त्यानंतर या प्रकरणातील आरोपपत्र दाखल झालं असून, या आरोपपत्रामधून आरोपींनी संतोष देशमुख यांच्यासोबत केलेल्या क्रौर्याचा एक एक भाग समोर येत आहे. नराधम आरोपी बेदम मारहाण करत असताना संतोष देशमुख हे त्यांना कळवळून विनवणी करत होते, अशी माहिती समोर आले आहे.
९ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण केल्यानंतर आरोपींनी त्यांना ठार मारण्याच्या हेतूने बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळे घायाळ झालेले संतोष देशमुख हे आरोपींकडे कळकळीची विनवणी करत होते. ‘’माझे हात पाय तोडा, पण माझ्या मुलांसाठी मला जिवंत सोडा’’, अशी विनंती ते आरोपींना करत होते. मात्र या विनवणीमुळेही पाषाण काळजाच्या निगरगट्ट आरोपींना कुठलाही कळवळा वाटला नाही. त्यांनी अत्यंत निर्दयीपणे संतोष देशमुख यांची हत्या केली. तसेच हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचीही विटंबना केली.
''माझे वडील मुलांसाठीतरी जगू द्या, अशी विनवणी करत होते,पण…’’, शोकाकुल वैभवी देशमुखचा सवाल
दरम्यान, ही घटना घडली त्या दिवशी, ९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३:२२ वाजता सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे व महेश केदार यांनी सरपंच देशमुख यांना उमरी टोलनाका येथे अडवले. त्यानंतर त्यांचे काळी जीप व कार या दोन वाहनांमधून अपहरण केले. आरोपींनी प्लास्टिकचा पाईप, लोखंडी रॉड, गॅस पाइप, क्लच वायर व काठीचा वापर केला. देशमुख यांना चिंचोली टाकळी शिव येथे घेऊन गेले. तेथे अमानुष मारहाण करत खून केला. सायंकाळी ६:३० वाजताचे सुमारास त्यांचा मृतदेह दैठणा फाटा येथे टाकून आरोपी पळून गेले होते.