Santosh Deshmukh: आरोपींना पळून जाण्यात मदत, दोन संशयितांना CID ने घेतलं ताब्यात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 21:21 IST2025-01-03T21:18:13+5:302025-01-03T21:21:28+5:30
Santosh Deshmukh Case Accused Updates: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तिन्ही आरोपींचा शोध घेत असताना सीआयडीने त्यांना पळून जाण्यात मदत करणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Santosh Deshmukh: आरोपींना पळून जाण्यात मदत, दोन संशयितांना CID ने घेतलं ताब्यात!
Santosh Deshmuk Case CID: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून केला जात आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींसह फरार असलेल्या तिघांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या तिन्ही आरोपींना पळून जाण्यात मदत केल्याप्रकरणी दोन संशयितांना सीआयडीने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीव्ही ९ ने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन चंद्रभान घुले, कृष्णा शामराव आंधळे आणि सुधीर ज्ञानोबा सांगळे हे तिघे फरार आहेत. या तिघांचा शोध सध्या पोलीस आणि सीआयडीचे पथक घेत आहेत.
दोन संशयितांना घेतले ताब्यात
सीआयडीची एसआयटी हत्या प्रकरणाचा तपास करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धारूरच्या कासारी या गावातून डॉ. संभाजी वायबसेंसह दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. वायबसे यांनी या तिघांना पळून जाण्यात मदत केल्याचा संशय आहे. या प्रकरणानंतर ते सापडत नव्हते. पोलीस त्यांच्या मागावर होते.
अखेर त्यांना ताब्यात घेण्यात आले. वायबसे यांच्यासह दोघांची चौकशी केली जात आहे. या तिघांचा संबंध वाल्मीक कराडशी असल्याचे आरोप होत आहे. सुदर्शन घुले हा वाल्मीक कराडच्या सांगणयावरूनच कामं करायचा असा दावाही सीआयडीने कोर्टात केलेला आहे.
बीडपोलिसांनी तिघांच्या संदर्भात नोटीस काढली आहे. सुदर्शन घुले हा केज तालुक्यातील टाकळीचा आहे, तर कृष्णा आंधळे हा धारूर तालुक्यातील मैदवाडी गावचा आहे. सुधीर सांगळे हा सुद्धा केज तालुक्यातील टाकळीचाच रहिवासी आहे. कृष्णा आंधळेमुळे पोलीस आणि सीयआयडी बीडसह आजूबाजूच्या जिल्ह्यातही तपास करत आहे.