संतोष देशमुख प्रकरण, १४ महिन्यांनी आरोपी येणार जेलबाहेर; कोर्टाची परवानगी, मोठे कारण समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 14:53 IST2026-03-08T14:53:00+5:302026-03-08T14:53:36+5:30
Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला.

संतोष देशमुख प्रकरण, १४ महिन्यांनी आरोपी येणार जेलबाहेर; कोर्टाची परवानगी, मोठे कारण समोर
Santosh Deshmukh Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील एक आरोपी १४ महिन्यानंतर कारागृहाबाहेर येणार असल्याची माहिती मिळाली आहे. न्यायालयाने या आरोपीला तशी परवानगी दिली आहे. परंतु, याबाबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना यावर आक्षेप घेतल्याचे म्हटले जात आहे.
सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी जयराम चाटे तब्बल १४ महिन्यांनंतर काही तासांसाठी कारागृहातून बाहेर येणार आहे. त्याच्या धाकट्या भावाच्या निधनानंतर होणाऱ्या विधीस उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाने त्याला पोलीस बंदोबस्तात जाण्याची परवानगी दिली आहे. जयराम चाटेचा धाकटा भाऊ श्रीराम चाटे याचे २ मार्च रोजी निधन झाले. बाराव्याच्या विधीस उपस्थित राहण्यासाठी जयराम चाटेच्या वकिलांनी न्यायालयात विशेष परवानगी मागितली होती.
कारागृहाबाहेर येण्यासाठी न्यायालयाने घातल्या अटी
जयराम चाटे याला परवानगी देताना न्यायालयाने काही अटी समोर ठेवल्या आहेत. याचे पालन आरोपीला करावे लागणार आहे. जयराम चाटे याला पोलिस बंदोबस्तमध्ये घेऊन गेले जाणार आहे. त्यानंतर काही तासात त्याला पुन्हा तुरूंगात आणले जाईल. आरोपीच्या वकिलांनी सर्व अटींचे पालन करण्याची तसेच पोलिस बंदोबस्ताचा खर्च भरण्याची तयारी दर्शवली. दिवंगत भाऊ श्रीराम चाटे यांच्या बाराव्या दिवसाच्या विधीसाठी पोलिस बंदोबस्तात उपस्थित राहण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. आरोपीवर गंभीर गुन्हे असल्याने त्याला बाहेर सोडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला होता. परंतु, दोन्ही बाजू ऐकल्यानंतर एक दिवसाची मर्यादित परवानगी जयराम चाटे याला देण्यात आली.
दरम्यान, जयराम चाटेच्या वकिलांकडून न्यायालयात अर्ज दाखल झाल्यानंतर मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. विधीच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदारी कोण घेणार? सव्वा वर्षापासून महाराष्ट्र बघतोय की हे आरोपी किती खालच्या पातळीचे आहेत. जर यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.