आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 16:14 IST2025-08-23T16:12:05+5:302025-08-23T16:14:37+5:30
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पाच प्रश्न विचारले आहेत.

आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे आता दोन्ही देशांमध्ये क्रिकेटचे सामने होणार आहेत. यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून प्रश्न विचारले आहेत. 'पाकिस्तानशी कोणतेही द्विपक्षीय क्रीडा संबंध राहणार नाहीत परंतु बहुपक्षीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तान संघासोबत सामने खेळता येतील', असं सरकारचे म्हणणे आहे. राऊतांनी पीएम मोदी यांना पत्र लिहून या निर्णयावर आक्षेप व्यक्त केला आहे.
'पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांचे रक्त अद्याप सुकलेले नाही. त्यांच्या कुटुंबियांचे अश्रू अद्याप थांबलेले नाहीत. अशा परिस्थितीत पाकिस्तानसोबत सामना खेळणे अत्यंत अमानवीय आहे', असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
"आशिया कपमध्ये पाकिस्तानशी सामना होणे भारतीयांसाठी खूप कठीण आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्रालयाच्या मंजुरीशिवाय हे शक्य नव्हते", असे या पत्रात राऊतांनी म्हटले.
पाकिस्तानसोबत सामने खेळणे हा आपला अपमान - संजय राऊत
"पाकिस्तानसोबत सामने खेळणे हा केवळ सैनिकांचाच नाही तर काश्मीरसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या प्रत्येक शहीदांचाही अपमान आहे. हे सामने दुबईमध्ये होत आहेत. जर ते महाराष्ट्रात असते तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने हे होऊ दिले नसते. हिंदुत्व आणि देशभक्तीपेक्षा क्रिकेटला प्राधान्य मिळाले आहे. तुमच्या दृष्टीने देशवासीयांच्या भावनांना काहीही किंमत नाही. शिवसेना तुमच्या निर्णयाचा निषेध करते, असे संजय राऊत म्हणाले.
आशिया कप ९ सप्टेंबरपासून होणार आहे. यासाठी भारताने आपला संघही जाहीर केला आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तान तीन वेळा आमनेसामने येऊ शकतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना १४ सप्टेंबर रोजी होऊ शकतो. हा सामना दुबईमध्ये खेळवला जाईल.
संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित केले
"देशवासीयांच्या वतीने त्यांना सरकारसमोर भावना मांडायच्या आहेत. जेव्हा तुम्ही म्हणता की ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही, तर पाकिस्तानशी सामना कसा होऊ शकतो? पहलगाम हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केला आणि २६ महिलांचे सिंदूर पुसले, तुम्हाला त्या माता-भगिनींचे दुःख समजले आहे का? तुम्ही म्हणालात की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, तर क्रिकेट आणि रक्त एकत्र वाहू शकते का?, असा सवाल राऊतांनी केला.
"पाकिस्तानसोबतच्या सामन्यांमध्ये खूप सट्टेबाजी आणि जुगार होतो. भाजपचे लोकही यात सहभागी आहेत. गुजरातचे जय शाह क्रिकेटशी संबंधित बाबी पाहतात. मग या सामन्यांमधून भाजपला मोठा फायदा होतो का?, असा आरोपही संजय राऊतांनी केला.