राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 13:04 IST2025-10-14T13:00:40+5:302025-10-14T13:04:11+5:30
Maha Vikas Aghadi MNS News: राज ठाकरे महाविकास आघाडीत जाणार की नाही, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे म्हटले जात आहे.

राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
Maha Vikas Aghadi MNS News: मुंबईसह होत असलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची वाढत असलेली जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. अलीकडेच ठाकरे बंधूंचे सहकुटुंब मातोश्रीवर स्नेहभोजन झाले. यातच राज ठाकरे यांना काँग्रेसला सोबत घेण्याची इच्छा असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला होता. परंतु, काँग्रेस नेत्यांनी सदर दावा फेटाळत मनसेबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला सोबत घेण्याची स्वत: राज ठाकरेंची इच्छा आहे. ही त्यांची भूमिका आहे. पण याचा अर्थ हा निर्णय नाही. कारण प्रत्येकाचे या राज्यात स्थान आहे. शिवसेनेचे आहे, डाव्या पक्षाचे स्थान आहे, तसेच काँग्रेसचेही स्थान आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी, आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरे स्वतः स्पष्ट करतील, असे निक्षून सांगितले. यावर काँग्रेस नेत्यांनी अशी कोणतीही चर्चा पक्षात झाली नसल्याचे म्हटले आहे.
मनसेवर चर्चा झाली नाही
राज ठाकरे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला म्हणाले की, मनसेसंदर्भात काँग्रेस पक्षात कोणताही चर्चा झालेली नाही. मित्रपक्षांशीही यासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांची स्वबळावर लढण्याची इच्छा आहे. परंतु, आघाडी किंवा युती करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे अधिकार दिले आहेत, असे चेन्नीथला यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत झाली. या बैठकीत मुंबईमध्ये स्वतंत्र आणि स्वबळावर लढावे, अशी मागणी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी केल्याची आणि आपल्या भावना काँग्रेसच्या हायकमांडकडे पोहोचवल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता याबाबत काँग्रेसच्या हायकमांडकडून काय निर्णय घेतला जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.