उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 11:21 IST2025-08-08T10:55:47+5:302025-08-08T11:21:28+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधींच्या घरी उद्धव ठाकरेंना मागे बसवल्याच्या दाव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
Sanjay Raut: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन सहकुटुंब भेट घेतली. मात्र या भेटीदरम्यान, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मागे बसवण्यात आल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंनी दिल्लीत महाराष्ट्राची लाज काढली अशा शब्दात शिंदे गटाने टीका केली आहे. तर भाजपने उद्धव ठाकरेंचा बैठकीचा फोटो शेअर करत स्वाभिमान शोधून दाखवा असं म्हटलं. सत्ताधाऱ्यांच्या या दाव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राहुल गांधी यांनी गुरुवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणुकीत घोटाळे झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांची राहुल गांधी यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी देखील राहुल गांधी यांनी निवडणुकीत झालेल्या घोटाळ्यावर प्रेझेंटेशन दिलं. त्यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत मागे बसले होते. यावरुनच उद्धव ठाकरे यांना मागे का बसवलं अशी चर्चा सुरु झाली. दुसरीकडे भाजपकडूनही उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आलं. त्यानंतर आता संजय राऊत यांनी स्क्रीन समोर बसून पाहताना त्रास होत असल्यामुळे मागे बसल्याचे म्हटलं.
"आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. समोर स्क्रीनवर काही प्रेझेंटेशन सुरू होतं. उद्धव ठाकरे यांना पुढे बसवण्यात आलं होतं. स्क्रीन समोर बसून पाहताना त्रास होत असल्याने आम्ही सगळेच पाठीमागे गेलो. ती बसायची जागा नव्हती. तिथे प्रेझेंटेशन सुरू होतं. भाजपचे जे फालतू लोक आहेत त्यांना समजायला हवं. उद्धव ठाकरे यांचे तुम्ही आणखी फोटो पाहिले नाहीत का," असा सवाल संजय राऊत म्हणाले.
"उद्धव ठाकरे यांच्याच कुटुंबाला राहुल गांधी आणि त्यांचे कुटुंबीय भेटले. राहुल गांधी यांचे नवीन घर दाखवण्यात आले. भाजपच्या वोट चोरी विरोधात हे प्रेझेंटेशन सुरू होतं. पुढून पाहण्यात थोडा त्रास होत असल्याने आम्ही मागे बसलो होतो. प्रमुख नेत्यांना पुढे बसवण्यात आला होतं. उद्धव ठाकरे हे टेक्निकल गोष्टीमध्ये थोडे तज्ञ आहेत इथून नीट दिसणार नाही म्हणून ते मागे आले, असंही संजय राऊत म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "आरे आरे आरे, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे... शिवरायांचा वारसा सांगता ना रे... खांग्रेसच्या मीटिंगमध्ये जाऊन शेवटच्या रांगेत बसलात रे? बाळासाहेबांनी आम्हाला आत्मसन्मान स्वाभिमान शिकवला. अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का रे? काँग्रेसने तुमची काय ही अवस्था करून ठेवली आहे आदित्य ठाकरे... तुमच्यापेक्षा एकेक खासदारवाले पक्ष बरे, त्यांना सुद्धा पुढच्या रांगेत बसवलं रे! महाराष्ट्राची दिल्लीत जाऊन तुम्ही पार लाज घालवलीत रे. थोडा जरी स्वाभिमान आत्मसन्मान शिल्लक असेल तर जरा तरी पेटून उ(बा)ठा ना रे, महाराष्ट्राची किंमत कोणी कुठे वाढवली ते जरा दुसऱ्या फोटोंत बघा रे," अशी टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी टीका केली.