Sanjay Raut on Girish Mahajan: पुणे पोलिसांनी खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर छापेमारी केली. यादरम्यान, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ, दारू आणि हुक्काचे सेवन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
कोणालाही अटक केली जातेआज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांना या रेव्ह पार्टीबाबत विचारण्यात आले असता ते म्हणाले की, माझ्याकडे त्याबद्दल माहिती नाही. सध्या कधी कोणाला अटक होईल, कधी कोणावर गोळीबार होईल, सरबत पिणाऱ्या माणसालाही दारु पितो म्हणून अटक केली जाईल, काहीही होऊ शकते. पोलीस आणि पोलिसांची यंत्रणा भाजप विरोधात असलेल्यांना याप्रकारे त्रास देण्यासाठीच इथे आहेत.
भाजपच एक रेव्ह पार्टी...याआधीही खडसेंच्या जावयाला ईडीने ताब्यात घेतले होते, पण त्यात काही मिळाले नाही. दोन दिवसांपासून एकनाथ खडसे सरकारच्या विरुद्ध, खास करुन गिरीश महाजनांच्या विरोधात ठामपणे भूमिका मांडतात. ते पुराव्यांसह बोलतात. त्यानंतर पुढील 24 तासात ही रेव्ह पार्टीची कारवाई होते. खडसेंनी जे मुद्दे मांडले, जे आरोप केले, त्याची चौकशी होत नाही. पण जो आरोप करतो, त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात. तुमचा संपूर्ण भारतीय जनता पार्टी ही एक रेव्ह पार्टी आहे, अशी टीका राऊतांनी केली.
गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाययावेळी गिरीष महाजनांवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, नाशिकमधील शिवसेनेच्या दोन लोकांना महाजन आज प्रवेश देत आहेत. त्यांच्यावर आधी गुन्हे दाखल केले, त्यांच्यावर पक्षात आणण्याचा दबाव आणला आणि भाजपमध्ये येण्याआधी त्यांच्यावरचे गुन्हे काढून टाकले, हे एक नवीन तंत्र आहे. आमचे सुधाकर बडगुजर होते, त्यांच्या कुटुंबीयांवर मकोकाच्या कारवाया केल्या. भाजपात गेले आणि रफादफा झाले.
नगर जिल्ह्यातील आमचे शहरप्रमुख किरण काळे यांनी भ्रष्टाचाराविरोधात नगरमध्ये आंदोलन सुरू केले. 400 कोटींचा घोटाळा काढला. त्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून पहाटे तीन वाजता अटक करण्यात आली. त्यामुळे खडसे आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई झाली असेल, तर आश्चर्य वाटणाचे कारण नाही. फडणवीसांच्या राज्यामध्ये आम्हाला अशा प्रकारच्या कारवायांना आम्हाला सामोरे जावे लागेलच. गिरीश महाजन नावाचा सांड हा मोकाट सुटलेला आहे. याला जर आवरले नाही, तर एक दिवस हा देवेंद्र फडणवीस यांनाही गाडल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल राऊतांनी यावेळी केला.