तुमचा ना छत्रपतींशी संबंध ना इतिहासाशी, केवळ...: संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 01:49 PM2023-11-23T13:49:21+5:302023-11-23T13:54:19+5:30

राज्यातले उद्योग कुठे जातायेत हे महाराष्ट्रातील उद्योगमंत्र्यांना माहिती नसेल तर ते दुर्दैव आहे असंही राऊत म्हणाले.

Sanjay Raut, MP of Uddhav Thackeray faction, attacked BJP | तुमचा ना छत्रपतींशी संबंध ना इतिहासाशी, केवळ...: संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल

तुमचा ना छत्रपतींशी संबंध ना इतिहासाशी, केवळ...: संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल

मुंबई - आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडतो, महाराष्ट्रात सध्या जे सुरू आहे त्यावर आवाज उठवतोय. राज्याची बेकायदेशीरपणे लूट चालू आहे त्यावर बोलतोय. त्याला तुम्ही वेडेपणा म्हणत असाल तर हो आम्ही वेडे आहोत. वेडात मराठे वीर दौडले साथ ही आमची परंपरा आहे. त्या परंपरेला धरून आणि स्मरून आम्ही हल्ले करतोय. तुमचा ना छत्रपतींशी संबंध, ना इतिहासाची, तुमचा केवळ खोक्यांशी संबंध अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, मी अधिक बोलत नाही. तुमचे प्रदेशाध्यक्ष यांच्या कर्तबगारी यावर बोला. आमच्यावर का बोलताय?. अजित पवार, शिंदे गटाचे बहुतेक आमदार, खासदार भाजपात प्रवेश करतील आणि भाजपाने त्यांना उमेदवारी दिली तर ते कमळ चिन्हावर निवडणूक लढतील. अजित पवार, शिंदे गटाला कमळाबाईच्या पदराखाली लपून निवडणूक लढवावी लागेल. ज्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरेंना सोडले ते बहुतेक सगळेच लोक पराभूत होतील. गद्दारांना स्वीकारण्याची मानसिकता लोकांची नाही. तुम्ही महापालिका निवडणूक घेत नाही. उद्या लोकसभा, विधानसभाही घेणार नाहीत अशी हुकुमशाही सुरू आहे असा आरोप त्यांनी केला. 

तसेच राज्यातले उद्योग कुठे जातायेत हे महाराष्ट्रातील उद्योगमंत्र्यांना माहिती नसेल तर ते दुर्दैव आहे. मकाऊला जाणे गुन्हा आहे असं मी म्हटलो नाही. वाळवंटात आणि चिखलात असं जग चीनने उभे केलेय त्यातून त्यांची आर्थिक उभारी मिळाली आहे. बावनकुळे यांनी साडे तीन कोटी उधळले असतील तर बोला आणि शांत बसा. तुम्ही मकाऊला जाऊन काय केले यावर आम्ही प्रश्न न विचारता तुम्हीच सांगत बसलाय असा टोला भाजपा नेत्यांना राऊतांनी लगावला. 

किरीट सोमय्यांना प्रत्युत्तर
ऑक्सिजन पुरवठा झाला नाही, कोरोना काळात प्रेतांचा खच पडला, गंगेत प्रेत वाहून गेली. मध्य प्रदेशात कोरोना काळात जे मृत झाले त्यांच्यावर उपचार केलेले दाखवून कोट्यवधीचा भ्रष्टाचार केला. सोमय्यांनी चुकून मुंबईचा उल्लेख केला. हे भंपक लोक आहेत. मुंबईसह महाराष्ट्र कोरोना काळात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात वाचवण्यात आला. तुम्ही जनमत घ्या. उद्धव ठाकरेंच्या कार्याची दखल देशातच नव्हे तर जगानेही घेतली. हे सगळे रावण आहेत अशा शब्दात संजय राऊतांनी सोमय्यांवर पलटवार केला. 

Web Title: Sanjay Raut, MP of Uddhav Thackeray faction, attacked BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.