“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 12:26 IST2025-10-16T12:18:32+5:302025-10-16T12:26:02+5:30
Sanjay Raut News: आम्ही जे आरोप करतो, त्यावर निवडणूक आयोग उत्तर द्यायला तयार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
Sanjay Raut News: मतदार याद्यांतील घोटाळ्याबाबत निवडणूक आयोगासोबत दोन दिवस बैठक झाली. निवडणूक याद्याच बोगस असतील तर त्या याद्यांना महत्त्व काय? ते मतच जर चुकीच्या पद्धतीने जात असतील तर त्याला अर्थ काय? आम्ही जे आरोप करतो, त्यावर आयोग उत्तर द्यायला तयार नाही. अशावेळी जर भूमिका असेल की आधी निवडणूक याद्या दुरूस्त करा. त्या निर्दोष करा, तर त्यात काय चुकीचे आहे, अशी विचारणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी निवडणूक आयोगासह भाजपा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड शाखा आहे. जशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी वा अन्य संघटना आहे, त्याप्रमाणे निवडणूक आयोग भाजपची शाखा आहे. आमच्या राजवटीत असे नव्हते. निवडणूक आयोगातील माणसे भाजपाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत असतील तर आम्ही त्यांच्याकडून कोणती अपेक्षा करणार. त्यांच्यासमोर सत्य मांडणे हे आमचे कर्तव्य आहे, असे संजय राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांना वकील कुणी केले?
महाविकास आघाडी ही आता महा कन्फ्युज आघाडी झाल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ते वकील आहेत आणि भाजपाचे नेते आहेत म्हणून आम्ही त्यांना निमंत्रित केले होते. आम्ही जे मुद्दे निवडणूक आयोगासमोर मांडले, ते त्यांच्या काळजात घुसले आहेत. तुम्ही चोऱ्या करता, घोटाळे करता आणि बोगस मतदानावर निवडणूक जिंकता, यात कन्फ्युजन काय आहे मिस्टर फडणवीस? मला सांगा जरा. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा गोंधळलेला मुख्यमंत्री देशाच्या इतिहासात झाला नाही. यांना कुणी वकील केले आणि यांनी कुठे वकिली केली, हे कळायलाच मार्ग नाही. नरेंद्र मोदी यांच्या मेहरबानीने जे मुख्यमंत्री देशभरात झाले, त्यापैकी फडणवीस एक आहे, ते कर्तृत्वावर मुख्यमंत्री झालेले नाहीत, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, मतदार यादीत गैरसोयीची नावे काढली जातात. यादीतील नावाबाबतचा गोंधळ समोर आला तर काही तासांतच ती नावे गायब केली जातात. विशेष म्हणजे याबाबत निवडणूक आयोगाला काहीच माहीत नसते. त्यामुळे निवडणूक आयोगाचे सर्व्हर दुसरा कुणी खासगी व्यक्ती चालवत आहे, असा गंभीर आरोप करत, घोळ सुधारल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, अशी ठाम भूमिका महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांनी मांडली. राज ठाकरे हेही सध्या महाविकास आघाडीसोबत दिसत असल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क लावले जात आहेत.