“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 13:30 IST2025-05-01T13:28:25+5:302025-05-01T13:30:05+5:30
Thackeray Group MP Sanjay Raut News: व्यापाऱ्यांना विकला गेलेला हा महाराष्ट्र निर्माण केला, या शब्दांत संजय राऊत यांनी सरकारच्या प्रगती पुस्तकावर प्रतिक्रिया देताना महायुतीवर निशाणा साधला.

“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
Thackeray Group MP Sanjay Raut News: प्रगतीचा पाढा वाचणे आणि प्रगती पुस्तकावर शेरा असणे यात फरक आहे. पाढे वाचायला काय झाला आहे त्यांना. कुठे आहे महाराष्ट्र जो महाराष्ट्राचा एक बाणा होता, कणखर खडखडीत भाणेदार होता, दिल्ली पुढे झुकणारा महाराष्ट्र गेल्या तीन वर्षात निर्माण झाला आहे. हिमालय कोण? हिमालय दिल्लीत उरलाय का? महाराष्ट्रात सहयाद्री कोण? एक सीएम आणि दोन डीसीएम हे महाराष्ट्राला आलेले टेंगुळ आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुती सरकार स्थापन झाले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या सर्व ४८ विभागांना १०० दिवसांचा धोरणात्मक कार्यक्रम आखून दिला होता. त्यात महत्त्वाची नवीन धोरणे, दूरगामी निर्णय आणि लोकाभिमुख उपक्रमांची आणखी सुरू केली. त्यामुळे या ४८ विभागांचा रिपोर्ट कार्ड जारी करण्यात आले आहे. त्यात १२ विभागांनी १०० टक्के गुण मिळवून अव्वल क्रमांक पटकावला आहे तर फक्त २४ टक्के गुण मिळवून एक विभाग नापास झाला आहे. यावरून संजय राऊतांनीमहायुती सरकारवर टीका केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
व्यापाऱ्यांना विकला गेलेला महाराष्ट्र निर्माण केला
मुख्यमंत्र्यांनी १०० दिवसांचे प्रगतीपुस्तक जाहीर केले. डोनाल्ड ट्रम्प यांनीही अमेरिकेत १०० दिवसाचा कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्र किती कमजोर झाला, त्याची श्वेतपत्रिका काढा. १०६ हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहण्याचा अधिकार नाही, लायकी शब्द वापरणार नाही. १०६ हुतात्म्यांच्या स्वप्नांना संपवून टाकले. व्यापाऱ्यांना विकला गेलेला महाराष्ट्र निर्माण केला, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला.
दरम्यान, शरद पवार यांनी राज-उद्धव एकत्र आले तर चांगले आहे, असे म्हटले. यावर संजय राऊतांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, शरद पवार यांच्या तोंडात साखर पडो. त्यांच्या भावना आम्ही समजून घेतल्या. राज ठाकरे यांनी त्यांच्याबरोबर युती करण्याचा प्रयत्न केला होता. पण या भावना आहेत. या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. स्वतः उद्धव ठाकरे या विषयावर सकारात्मक आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.