“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 13:36 IST2025-05-18T13:30:57+5:302025-05-18T13:36:45+5:30
Sanjay Raut News: सर्वपक्षीय शिष्टमंडळावरून संजय राऊतांनी केंद्र सरकारवर टीका केली.

“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
Sanjay Raut News: सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा विषय भाजपाने राजकीय केला आहे. उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव शिष्टमंडळात आहेत. हे महाशय काय मांडणार? इतक्या घाईघाईने हे करायची गरज नव्हती. विरोधी पक्षाची मागणी विशेष अधिवेशन घ्यावे आणि चर्चा करावी, ट्रम्प यांच्या सोबत काय चर्चा झाली हे सांगावे, अशी होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटापेक्षा आमचे जास्त खासदार आहेत. हे वऱ्हाड पाठवायची गरज नव्हती. INDIA ब्लॉकच्या सदस्यांनी यावर बहिष्कार टाकावा, या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मीरमध्ये न्या. युक्रेन आणि रशियात युद्ध झाल्यावर त्यांच्या प्रमुखांनी भारतात शिष्टमंडळ पाठवले नाहीत. इस्रायलच्या नेतन्याहू यांनीही शिष्टमंडळ पाठवले नाही. तुम्हाला कळत नाही पण तुम्ही काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयकरण करत आहात. जगात तुम्ही हा प्रश्न घेऊ जात आहात. याचा अर्थ पंतप्रधान कमजोर आहेत. २०० देश फिरले, पण एकही देश पाठिशी उभा राहिला नाही, म्हणून तुमच्यावर ही नौंटकी करण्याची वेळ आली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली
सरकारच्या पापाची वकिली करायला जात आहेत, देशाची नाही
दहशतवादाचा पूर्ण बिमोड करण्याची क्षमता निर्माण झालेली असताना ट्रम्प यांनी एकतर्फी सीझफायर जाहीर करून पाकिस्तानच्या दहशतवादाला मोकाट सोडले. ट्रम्प यांना मध्यस्थी करण्याची गरज का भासली हा प्रश्न तुम्ही वॉश्गिंटनला जाऊन विचारणार असाल तर जा. तुम्ही सरकारच्या ट्रॅपमध्ये अडकत आहात. सरकारने जे गुन्हे आणि पाप केले, त्याची वकिली करायला तुम्ही चालला आहात, देशाची वकिली करायला जात नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शिवसेनेचा प्रतिनिधी पाठवताना आम्हाला विचारले का, या डेलिगेशनमध्ये तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, आरजेडीचे कोणी दिसते का ? मग सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाते हे ते कोणत्या आधारावर सांगता. लोकसभेत शिवसेनेचे नऊ सदस्य आहेत. शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी आम्हालाही मिळायला पाहिजे, आमचे सदस्य जास्त आहेत, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.