"महायुती सरकारला बहुमताचं डिप्रेशन, त्यातून ते बाहेरच पडत नाहीयेत’’, संजय राऊत यांची खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 11:07 IST2025-02-06T11:05:33+5:302025-02-06T11:07:18+5:30
Sanjay Raut Criticize Mahayuti government: शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारला खोचक टोला लगावला आहे. या सरकारला बहुमताचं डिप्रेशन आलं आहे. त्यातून ते बाहेरच पडत नाही आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

"महायुती सरकारला बहुमताचं डिप्रेशन, त्यातून ते बाहेरच पडत नाहीयेत’’, संजय राऊत यांची खोचक टीका
गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीने दणदणीत बहुमतासह पुन्हा एकदा राज्यातील सत्ता मिळवली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारही स्थापन झालं होतं. मात्र प्रचंड बहुमतासह विजय मिळवल्यानंरही मागच्या काही महिन्यात महायुतीच्या सरकारची घडी नीट बसली नसल्याचं दिसत आहे. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारला खोचक टोला लगावला आहे. या सरकारला बहुमताचं डिप्रेशन आलं आहे. त्यातून ते बाहेरच पडत नाही आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावर टीका करतानाच राज्य सरकारवर निशाणा साधला. त्यावेळी ते म्हणाले की, महायुतीचे हे जे सरकार आहे, त्यांना विजयाचं डिप्रेशन आलेलं आहे. विजयाचं डिप्रेशन हा अधिक गंभीर असा आजार आहे. या सरकारला बहुमताचं आलेलं आहे आणि ते यामधून बाहेरच पडायला तयार नाही आहेत. चुकीच्या पद्धतीन मिळवलेलं बहुमत, त्यातून मिळवलेला विजय आणि त्या विजयाचा धक्का न पचवता आल्यामुळे आलेलं डिप्रेशन त्यातून बोलत आहेत.
मी काय बोललो आहे हे समजण्यासाठी माणसानं आधी साक्षर असावं लागतं. साक्षर असावं लागलं आणि इमानदार असावं लागतं. देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत, असं मी विचारलं होतं. त्या संदर्भात माझ्याकडे जी माहिती होती, ती मी दिली. त्याच्यावर तुम्ही प्रत्युत्तर द्या. मुळात आपण कामाख्याला जाऊन अघोरी विधी केले की नाही, याबाबत कुणीही उत्तर देत नाही. अघोरी विद्या अंधश्रद्धेच्या कायद्याच्या विरोधामध्ये असतानासुद्धा अशा प्रकारे राजकारणामध्ये कुणी काम करत असेल, तर ते महाराष्ट्राच्या पुरोगामी संस्कृतीला आणि परंपरेला शोभणारं नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.