Sanjay Raut News: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यातच उद्धव आणि राज ठाकरे फोटोमध्ये केव्हाच एका फ्रेममध्ये आलेले असताना आता राजकीयदृष्ट्या कसे एकत्र यायचे याची फ्रेम तब्बल अडीच तास झालेल्या चर्चेत ठरली. दसरा मेळाव्यात दोघांनी शिवाजी पार्कवर एकत्र यायचे का यावरही दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र त्याबाबत अंतिम निर्णय झाला नाही. यातच ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडीचे काय होणार, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन युती करणे शरद पवार आणि काँग्रेसला मान्य आहे का, याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सत्ताधारी आणि विरोधक कंबर कसून तयारीला लागले आहेत. यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूकही होणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक ही प्रचंड प्रतिष्ठेची बनली आहे. शिवसेनेत उभी ऐतिहासिक फूट पडल्यामुळे परिस्थिती बदललेली आहे. मुंबई महापालिका राखण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. यातच नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या प्रमाणात शिंदे गटात जात आहेत. अशातच ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याबाबतच्या हालचालींनी वेग घेतल्याचे मानले जात आहे. याबाबत बैठकांचे सत्र सुरू झाले असून, उद्धव ठाकरे मातोश्री सोडून शिवतीर्थवर जात असल्याचे पाहायला मिळाले.
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?
मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शरद पवारांना राज-उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत काहीही अडचण नाही. मुंबईमध्ये शंभर टक्के शिवसेनेचीच ताकद आहे. भाजपाकडे एक विशिष्ट वर्ग आहे. तसेच पैसा आणि सत्ता आहे. असे असले तरी मुंबईवर पगडा मराठी माणसांचा राहील. तो त्यांना नष्ट करायचा आहे. त्यांनी सातत्याने तसे प्रयत्न सुरू केले आहेत. तो आम्हाला हाणून पाडायचा आहे. हे काम फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र आल्यावरच आपल्याला करता येईल. हे काँग्रेसलाही माहिती आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शरद पवार यांचा विषय तसा अडचणीचा नाही. त्यांना महाराष्ट्राच्या भावना माहिती आहेत. काँग्रेसचं दिल्लीतील जे हायकमांड आहे, काँग्रेसचे अध्यक्ष असतील, खासदार राहुल गांधी असतील, मुंबई महाराष्ट्रात काय चालू आहे याची महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेतृत्व देत असेल. विषय फक्त मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आहे. आम्ही इंडिया आघाडी म्हणून एकत्र आहोत. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत. आतापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वतंत्र निवडणुका लढलेल्या आहेत. त्यांनी कुणाबरोबर युती केली असे मला दिसलेले नाही. त्यांची प्रथमच शिवसेनेसोबत युती होण्याची शक्यता आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.