संभाजीराजेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; म्हणाले, 'इतिहास तज्ज्ञांची समिती नेमून...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 21:40 IST2025-03-22T21:38:07+5:302025-03-22T21:40:34+5:30
Sambhajiraje Chhatrapati Devendra Fadnavis: संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलेल आहे. छत्रपती ताराबाई महाराणी यांच्यासंदर्भात हे पत्र आहे.

संभाजीराजेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; म्हणाले, 'इतिहास तज्ज्ञांची समिती नेमून...'
Sambhajiraje Chhatrapati News: संभाजीराजे छत्रपती यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. छत्रपती ताराबाई महाराणी यांच्या समाधी स्थळाबाबत संभाजीराजेंनी हे पत्र लिहिले असून, एक इतिहास तज्ज्ञांची समिती नेमण्याची मागणीही केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सरकारचे लक्ष छत्रपती ताराबाई महाराणी यांच्या समाधीच्या दुरावस्थेकडे वेधले आहे.
संभाजीराजेंनी पत्रात काय म्हटलं आहे?
"शिवपुत्र श्री छत्रपती संभाजी महाराज व श्री छत्रपती राजाराम महाराज यांच्यानंतर स्वराज्याची धुरा हाती घेऊन ज्यांनी सात वर्षे औरंगजेचाशी लढा दिला व श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले, त्या शिवस्नुषा, मुघलमर्दिनी छत्रपती ताराबाई महाराणी साहेब यांचे स्मृतिस्थळ सातारा येथे संगम माहुली या ठिकाणी असल्याचे इतिहास अभ्यासकांनी मांडले आहे."
"पतीच्या मृत्यूनंतर खचून न जाता, शस्त्र हाती धरून रणांगणात उतरून औरंगजेबासारख्या क्रूर व बलाढ्य बादशहाला या महाराष्ट्राच्या मातीतच ज्यांनी गाडले, त्या स्वराज्यरक्षिका ताराराणी साहेबांचे स्मृतिस्थळ हे महाराष्ट्रासाठी जाज्वल्य प्रेरणास्थान आहे", असे संभाजीराजेंनी म्हटले आहे.
शिवस्नुषा श्री छत्रपती ताराबाई महाराणी साहेबांच्या समाधी स्थळाबाबत मुख्यमंत्री महोदयांस पत्र दिले…@CMOMaharashtra@Dev_Fadnavispic.twitter.com/NhohbDU4jI
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) March 22, 2025
संभाजीराजे पत्रात पुढे म्हणतात, "मात्र, सध्या हे स्मृतिस्थळ अत्यंत दयनीय व दुर्लक्षित स्थितीत आहे. महाराष्ट्र शासनाने इतिहास तज्ज्ञांची समिती नेमून या स्मृतीस्थळाबद्दल अधिक व विस्तृत संशोधन करावे व तत्काळ या स्मृतीस्थळाचा जीर्णोद्धार करावा, ही विनंती", असे संभाजीराजे छत्रपतींनी मुख्यमंत्र्यांना म्हटले आहे.