मराठा समाजाची दिशाभूल करून 'सारथी' बंदच करणार आहात का?; संभाजीराजेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 04:24 PM2020-07-03T16:24:28+5:302020-07-03T16:26:32+5:30

स्वायत्ता राखणार असा शब्द दिला होता, आज सारथी संस्था स्वायत्त राहिली आहे का?

Sambhaji Chhatrapati ask question to maharashtra government on Sarathi institute | मराठा समाजाची दिशाभूल करून 'सारथी' बंदच करणार आहात का?; संभाजीराजेंचा सवाल

मराठा समाजाची दिशाभूल करून 'सारथी' बंदच करणार आहात का?; संभाजीराजेंचा सवाल

Next
ठळक मुद्देलोकशाही मध्ये समाज सर्वात मोठा असतो. पण तो जागृत असला पाहिजे.मराठा समाजातील भावी पिढीच्या कल्याणासाठी मराठा समाजाने पुन्हा एकदा एकत्र येण्याचे त्यांनी आवाहन केलं

सारथी संस्थेसाठी मराठा समाजाने पुन्हा एकत्र येण्याची गरज आहे. तसेच सारथी संस्थेच्या बाबत संबंधित मंत्र्यांनी दुटप्पी भूमिका सोडून द्यावी अशी समाजाची भावना आहे, असे मत खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी अनेक प्रश्न विचारून मराठा समाजाची दिशाभूल करून 'सारथी' बंदच करणार आहात का? असा सवाल विचारला. 

त्यांनी लिहिलं की,''मराठा समाजाने संघर्षाने मिळवलेली आणि राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या नावाने अस्तित्वात आलेली ही संस्था आहे. याबाबत प्रत्येक वेळी केवळ आश्वासने देऊन समाजाची दिशाभूल करून ती बंदच करून टाकणार आहेत का? तर तसेही सांगा. संबंधित मंत्र्यांकडून काही प्रश्नांची उत्तरे मराठा समाजाला अपेक्षित आहेत. मराठा समाजाच्या वतीने पुण्यात आंदोलन केलं, तिथे जी आश्वासने सरकारच्या वतीने समाजाला दिली गेली त्यापैकी किती पूर्ण केली?''


''स्वायत्ता राखणार असा शब्द दिला होता, आज सारथी संस्था स्वायत्त राहिली आहे का? संस्थेमध्ये गैरव्यवहार केला असा आरोप करून संस्था बदनाम केली गेली. तिची चौकशी सुद्धा केली, त्याचे पुढे काय झाले? की तो केवळ फार्स होता? मुळात सारथी संस्था कोण कोणत्या उद्दिष्टांकरिता अस्तित्वात आली होती? आणि आता कोणती उद्दिष्टे समोर आणली जात आहेत? एखादी संस्था जी अस्तित्वात येऊन केवळ १ वर्ष झाले होते, तिच्या पाठीमागे काही लोक एवढं हात धुवून लागले, की तिला जर्जर अवस्थेत नेऊन ठेवलं. कुणी एका अधिकाऱ्याने किंवा मंत्र्याने गैरव्यवहार केला म्हणून शासनाच्या किती मंत्रालयाना टाळे लावले? याचाही हिशोब झाला पाहिजे ना कधीतरी,''असेही त्यांनी विचारले.

ते पुढे म्हणाले की,''पण एखाद्या समाजाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय हातात घेऊन उभी राहत असलेल्या संस्थेचे लगेच पंख छाटण्याचा यशस्वी प्रयत्न केला जात आहे. लोकशाही मध्ये समाज सर्वात मोठा असतो. पण तो जागृत असला पाहिजे. जागृत झालेला समाज एकवटतो. एक झालेल्या समाजाची फार मोठी ताकद असते, त्यापुढे मोठमोठ्या सत्तांना झुकाव लागतं. यातूनच मराठा समाजाने, आरक्षण मिळवलं, अनेक संस्था मिळवल्या. अजूनही अनेक गोष्टी समाजाला मिळवता येतील. सारथी च्या बाबतही समाजाला जे पाहिजे तेच होईल. संस्था ज्यांच्या नावाने आहे त्या राजर्षी शाहू महाराजांच्या वंशजाच्या नात्याने समाज जागा करणं हे माझं कर्तव्य समजतो. सारथी च्या स्वायत्ततेसाठी आणि मराठा समाजातील भावी पिढीच्या कल्याणासाठी मराठा समाजाने पुन्हा एकदा एकत्र येण्याचे आवाहन करतो.'' 

Web Title: Sambhaji Chhatrapati ask question to maharashtra government on Sarathi institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.