"सलमान खान भारतीय नागरिक, संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला तर त्यात गैर काय..?’’, एकनाथ शिंदेंचा टीकाकारांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 07:55 IST2026-02-11T07:54:52+5:302026-02-11T07:55:34+5:30
Eknath Shinde News: बॉलिवूड अभिनेता सलमान खान यानेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. संघाच्या कार्यक्रमाला सलमान खानने लावलेल्या उपस्थितीबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

"सलमान खान भारतीय नागरिक, संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला तर त्यात गैर काय..?’’, एकनाथ शिंदेंचा टीकाकारांना सवाल
मुंबई - सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नुकत्याच झालेल्या मुंबईतील एका कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. बॉलिवूड अभिनेता सलमान खान यानेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. संघाच्या कार्यक्रमाला सलमान खानने लावलेल्या उपस्थितीबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली असून, सलमान खान भारतीय नागरिक, संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला तर त्यात गैर काय..? असा सवाल शिंदे यांनी टीकाकारांना विचारला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना सलमान खानने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला लावलेल्या उपस्थितीबाबत एकनाथ शिंदे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रभक्त आणि देशभक्त संस्था असून गेल्या शंभर वर्षांपासून देशात कार्यरत आहे. आपत्ती आली त्या ठिकाणी संघ नेहमीच पुढे असतो. संघाच्या कार्यकर्त्यांच्या कणाकणात राष्ट्रभक्ती भरलेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, संबंधित कार्यक्रम मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. सलमान खान हा भारताचा नागरिक असून तो येथील परंपरा आणि संस्कृती मान्य करतो. त्यामुळे कार्यक्रम मुंबईत असताना त्याने उपस्थित राहण्यात गैर काय आहे, असा सवालही एकनाथ शिंदे यांनी यावेळी टीकाकारांना विचारला.