RTE Maharashtra Result 2026: आरटीई प्रवेशाची लॉटरी जाहीर; निवड यादी कशी पाहायची? वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 15:53 IST2026-04-06T15:47:44+5:302026-04-06T15:53:35+5:30
RTE Maharashtra Admission 2026: आरटीईच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत अर्ज नोंदणी पूर्ण झाली असून, सोमवारी (६ एप्रिल) शिक्षण आयुक्तांच्या उपस्थितीत सोडत जाहीर करण्यात आली आहे.

RTE Maharashtra Result 2026: आरटीई प्रवेशाची लॉटरी जाहीर; निवड यादी कशी पाहायची? वाचा सविस्तर
मुंबई : आरटीईच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत अर्ज नोंदणी पूर्ण झाली असून, सोमवारी (६ एप्रिल) शिक्षण आयुक्तांच्या उपस्थितीत सोडत जाहीर करण्यात आली आहे. यंदा प्रवेश प्रक्रियेत सुरुवातीला १ किलोमीटर अंतराची अट घालण्यात आल्यामुळे अर्ज नोंदणीवर परिणाम झाला होता. मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर ही अट मागे घेण्यात आली. परिणामी राज्यभरातील ८,७०१ शाळांमधील १ लाख १४ हजार ८२६ जागांसाठी तब्बल ३ लाख ९० हजार अर्ज दाखल झाले आहेत. ही सोडत प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने पार पडली असून, शाळानिहाय लाभार्थी विद्यार्थ्यांची यादी आता अधिकृत पोर्टलवर उपलब्ध होत आहे. तसेच सोडत प्रक्रियेत गैरप्रकार आढळल्यास संबंधित जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन ई-मेलद्वारे तक्रार नोंदवावी, असे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले.
आरटीई ऑनलाइन प्रवेश निवड यादी कशी तपासायची? (Maharashtra RTE Merit List 2026)
लॉटरी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालकांना आपल्या पाल्याचे नाव निवड यादीत आहे की नाही, हे खालील पद्धतीने तपासता येईल:
१) अधिकृत वेबसाईटला भेट द्या: सर्वात आधी student.maharashtra.gov.in या पोर्टलवर जा.
२) Application Status: होमपेजवर असलेल्या 'Application Status' किंवा 'RTE Results' या पर्यायावर क्लिक करा.
३) नोंदणी क्रमांक टाका: तुमच्या पाल्याचा अर्ज नोंदणी क्रमांक (Application Number) प्रविष्ट करा.
४) यादी डाऊनलोड करा: जिल्ह्यानुसार जाहीर झालेली 'Selection List' किंवा 'Waiting List' डाऊनलोड करून त्यामध्ये नाव तपासा.
५) SMS अलर्ट: निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) द्वारे देखील कळवले जाईल.
प्रवेशासाठी महत्त्वाचे नियम आणि कागदपत्रे
शाळा निवडीची अट: यंदा १ किमी अंतराची अट रद्द झाल्यामुळे पालकांनी १ किमी, १ ते ३ किमी आणि ३ किमी पेक्षा जास्त अंतरावरील शाळांची निवड केली आहे.
कागदपत्र पडताळणी: निवड झाल्यानंतर विहित मुदतीत कागदपत्रांची पडताळणी करणे अनिवार्य आहे. कागदपत्रे अपूर्ण असल्यास प्रवेश रद्द होऊ शकतो.
रहिवासी पुरावा: रहिवासी पुराव्यासाठी आता गॅस बुक (Gas Book) ग्राह्य धरले जाणार नाही. त्याऐवजी राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक (Nationalized Bank Passbook) आवश्यक आहे.
दिव्यांग विद्यार्थी: दिव्यांग प्रवर्गातून अर्ज केला असल्यास किमान ४०% दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.