महाविहार मुक्तीसाठी आरपीआयचे नेते एकवटले; १४ ऑक्टोबरला मुंबईमध्ये काढणार महामोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 09:33 IST2025-10-11T09:33:05+5:302025-10-11T09:33:43+5:30
केंद्रात राज्यमंत्री असलो तरी बौद्ध समाजाचा कार्यकर्ता म्हणून या आंदोलनात सहभागी झालो आहे. - आठवले.

महाविहार मुक्तीसाठी आरपीआयचे नेते एकवटले; १४ ऑक्टोबरला मुंबईमध्ये काढणार महामोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांचे सर्वोच्च जागतिक श्रद्धास्थान आहे. याचा ताबा बौद्धांकडे मिळण्यासाठी आरपीआयचे नेते एकवटले. महाविहार मुक्तीसाठी १४ ऑक्टोबर राेजी दुपारी १२ वाजता मुंबईत मेट्रो ते आझाद मैदानदरम्यान महामोर्चा आयोजित केल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खा. वर्षा गायकवाड, खा. चंद्रकांत हंडोरे, आ. संजय बनसोडे, प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. राजेंद्र गवई, नानासाहेब इंदिसे, अविनाश महातेकर, गौतम सोनवणे, सिद्धार्थ कासारे आदी उपस्थित होते.
मंत्री असलो तरी कार्यकर्ता म्हणून जाणार : आठवले
केंद्रात राज्यमंत्री असलो तरी बौद्ध समाजाचा कार्यकर्ता म्हणून या आंदोलनात सहभागी झालो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत निवेदन दिले असून, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी चर्चा केली आहे. बिहार सरकारने याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे, असे रामदास आठवले म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयात ३० ऑक्टोबरला सुनावणी आहे. बिहार सरकारने बौद्धांच्या धार्मिक भावनांची जाण ठेवून सकारात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे आठवले म्हणाले. संविधानापूर्वी महाबोधी महाविहार व्यवस्थापन कायदा १९४९ बीटी ॲक्ट लागू झाला. तो रद्द करावा, असेही आठवले म्हणाले.