भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण केली. याप्रकरणी नितीन देशमुख यांना पोलिसांनी अटक केली. परंतु, नितीन देशमुख यांना कोणत्या पोलीस ठाण्यात नेले, या संदर्भात माहिती मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार यांना राग अनावर झाला आणि त्यांनी आझाद मैदान पोलिसांना झापले. रोहित पवार आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये झालेला वादविवादात कॅमेऱ्यात कैद झाला.
व्हायरल झालेला व्हिडीओ आझाद मैदान पोलीस ठाण्यातील आहे, जिथे रोहित पवार समर्थकांसह नितीन देशमुख कुठे आहेत? याची विचारपूस करताना दिसत आहेत. यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याने सहकार्य न केल्याने रोहित पवार भडकले. "हातवारे करू नका... आवाज खाली करा... शहाणपणा करू नका... बोलता येत नसेल तर बोलू नका, कळले का?" अशा शब्दांत त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला झापले. त्यावेळी जितेंद्र आव्हाड देखील पोलीस ठाण्यात उपस्थित होते.
"विधीमंडळ आवारात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर हल्ला करुन त्यांनाच पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड साहेब यांच्यासोबत सरकारविरोधात आंदोलन केले. आरोपीला मोकाट सोडून पिडीताला अटक करणं हे चोराला सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार असून सत्तेतून आलेली ही मस्ती आहे, पण सरकारच्या या जुलमाविरोधात आम्ही लढत राहू!", असा इशारा रोहित पवार यांनी दिला.