Rohit Pawar questions to Chandrakant Patil; Where did the loan amount of the Maharashtra went? | रोहित पवारांनी मागितला चंद्रकांत पाटलांकडे हिशेब; राज्यावरील कर्जाची रक्कम गेली कुठे?

रोहित पवारांनी मागितला चंद्रकांत पाटलांकडे हिशेब; राज्यावरील कर्जाची रक्कम गेली कुठे?

मुंबई : भाजपा सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटलांनी राज्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवू अशी घोषणा केली होती. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. तसेच त्यांना सहकार्य करण्याचे आवाहनही केले आहे. 


महाराष्ट्राचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटलांनी एक घोषणा केली होती की, इथून पुढे राज्यात रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही. ही घोषणा करून आता एक वर्ष होत आलं, रस्त्यावरचे खड्डे तर बुजले नाहीतच पण या सरकारने राज्याच्या तिजोरीला मात्र मोठा खड्डा पाडला आहे, अशी टीका पवारांनी फेसबूक पोस्टमध्ये केली आहे. 


तसेच यामध्ये त्यांनी राज्यावरील 6.7 लाख कोटींचा कर्जाच्या बोजाचाही उल्लेख केला आहे. राज्यावर जवळपास ६ लाख ७१ हजार कोटी रुपयांच कर्ज आहे, सरासरी हिशोब केला तर राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर ५४ हजार रुपयांचा बोजा पडला आहे. मला मान्य आहे की राज्याचा कारभार चालवताना कर्ज काढण्याची गरज भासू शकते, आघाडी सरकारच्या काळात देखील कर्ज काढलं गेलं होतं पण त्याकाळात काढलेल्या कर्जातून होणारी कामे आपणा सर्वांना दिसत होती. आज समस्या हीच आहे की गेल्या पाच वर्षात कर्जे तर भरमसाठ काढली गेली परंतु त्यामुळे ना शेतकरी कर्जमुक्त झाला, ना युवकांना रोजगार मिळाला, अहो रस्त्यावरचे साधे खड्डे देखील बुजले नाहीत मग ही रक्कम नेमकी गेली कुठे ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 


यानंतर त्यांनी चंद्रकांत पाटलांना आवाहन करताना तुमच्या काळात झालेल्या धोरणात्मक चुका सुधारून राज्याला पुन्हा एकदा योग्य दिशेने घेऊन जाण्याचं काम सुरू झालं आहे आपण देखील विरोधी पक्षाची भूमिका योग्यप्रकारे निभावत आम्हाला सहकार्य करावे, असे म्हटले आहे. तसेच सरकार महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशात अग्रेसर बनवणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

Web Title: Rohit Pawar questions to Chandrakant Patil; Where did the loan amount of the Maharashtra went?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.