"दोन महिन्यांपासून फोटो असताना पत्रकार परिषदेत चेष्टा करता"; मुंडेंचा उल्लेख करत रोहित पवारांनी फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 10:15 IST2025-03-04T09:44:06+5:302025-03-04T10:15:14+5:30

Rohit Pawar on Santosh Deshmukh Murder Case: सरपंत संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला.

Rohit Pawar criticized CM Devendra Fadnavis after the photos of Santosh Deshmukh murder surfaced | "दोन महिन्यांपासून फोटो असताना पत्रकार परिषदेत चेष्टा करता"; मुंडेंचा उल्लेख करत रोहित पवारांनी फटकारलं

"दोन महिन्यांपासून फोटो असताना पत्रकार परिषदेत चेष्टा करता"; मुंडेंचा उल्लेख करत रोहित पवारांनी फटकारलं

Beed Santosh Deshmukh Murder Case: बीडच्या मस्साजोगचे सरपंत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या हत्याकांडाचे धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाल्याचे म्हटलं जात आहे. अशातच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा तात्काळ राजीनामा घ्यायला हवा असं म्हटलं आहे. सरकारकडे हे फोटो दोन महिन्यांपासून असताना कारवाई  नाही केली असा दावा रोहित पवार यांनी केला. 

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे हादरवणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचे फोटो पाहून सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संतोष देशमुख यांना मारहाण आणि हत्या करताना १५ व्हिडीओ आणि आठ फोटो काढण्यात आल्याचे समोर आलं आहे. यावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना रोहित पवार यांनी या फोटोंवरुन सरकारवर निशाणा साधला. दोन महिन्यांपासून हे फोटो तुमच्याकडे असताना तु्म्ही कारवाई केली नाही त्यामुळे त्यामुळे तुमच्याकडे मन आहे असा प्रश्न पडतो असं रोहित पवार म्हणाले.

"हे फोटो काल आपल्यासमोर आले. पण दोन महिन्यांपूर्वीच हे फोटो मुख्यमंत्री देवेंदर फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे आले असावेत. दोन महिन्यांपूर्वी हे फोटो तुमच्याकडे असताना सुद्धा याप्रकरणी एक धाडसी निर्णय घ्यावा असं तुम्हाला वाटत नसेल तर तुम्हाला मन आहे का असा प्रश्न पडतो. देवेंद्र फडणवीस यांना मला विनंती करायची आहे की तुमची मैत्री कचऱ्यात टाका पण आजच्या आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा सरकारने घेतलाच पाहिजे. कारण वाल्मीक कराड हा धनंजय मुंडेंचा खास माणूस आहे हे अख्ख्या जगाला माहिती आहे. दोन महिने फोटो येऊन तुम्ही ज्या पद्धतीने वागत आहात त्यावरुन कदाचित तुम्ही धनंजय मुंडेंची पाठ राखण करतात असं आमच्या सगळ्यांचे मत आहे," असं रोहित पवार म्हणाले.

"मुख्यमंत्री म्हणून तुमच्याकडे एवढी ताकद आहे की तुम्ही कोणालाही उभा करू शकता आणि कोणालाही बसवू शकता. ती ताकद दाखवायची तुम्हाला गरज आहे. तुमच्याकडे हे फोटो दोन महिन्यांपूर्वी आले आहेत. हे फोटो काल पाहिल्यानंतर आम्हाला झोपा लागल्या नाहीत. तुम्हाला मात्र दोन महिने झोपा लागल्या. परवा तुम्ही पत्रकार परिषद घेता आणि एकमेकांची चेष्टा करता. हे फोटो तुमच्याकडे असताना सुद्धा तुमचं मन तुम्हाला कुठे बोललं नाही की माणुसकी जपली पाहिजे. तुम्ही मैत्री जपता,सरकार जपता आहात. पण माणुसकी जपणं तुम्हाला जमलं नसेल तर तुमचे पाय धरले पाहिजे," असंही रोहित पवार म्हणाले.
 

Web Title: Rohit Pawar criticized CM Devendra Fadnavis after the photos of Santosh Deshmukh murder surfaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.